सिया-चेतनचा हादरवून टाकणारा कांड, जपानी व्हिडीओ पाहून केतनला… चकवा देण्यासाठी असा होता प्लॅन!
सिया आणि चेतनने केतनच्या हत्येसाठी सुपारी देण्याचाही प्रयत्न केला. या कामासाठी त्यांना एक व्यक्तीही मिळाली होती. सुरुवातीला त्या व्यक्तीने हत्या करण्यास होकार दिला. मात्र नंतर तो घाबरला आणि त्याने हे काम करण्यास नकार दिला.

Ketan Agarwal Murder Case : पुण्यातील केतन अग्रवाल हत्येप्रकरणातील प्रमुख आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आज वडगाव न्यालयापुढे हजर करण्यात आले. या दोन्ही आरोपींच्या न्यायलयीन कोठडीत 29 जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, केतनच्या हत्येबाबत आणखी गंभीर आणि खळबळ माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार केतनला मारण्यासाठी सिया आणि चेतन यांनी एका व्यक्तीला सुपारी दिली होती. तसेच पोलिसांच्या चौकशीला सामोरे जाण्यासाठी या दोघांनी प्रशिक्षण म्हणून जपानी व्हिडीओ पाहिले होते.
केतनला मारण्याची दिली सुपारी
समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार सिया आणि चेतनने केतनच्या हत्येसाठी सुपारी देण्याचाही प्रयत्न केला. या कामासाठी त्यांना एक व्यक्तीही मिळाली होती. सुरुवातीला त्या व्यक्तीने हत्या करण्यास होकार दिला. मात्र नंतर तो घाबरला आणि त्याने हे काम करण्यास नकार दिला. आता हीच व्यक्ती सिया आणि चेतनविरोधातील सर्वात महत्त्वाचा साक्षीदार ठरली आहे. संबंधित व्यक्तीला सुपारी देण्यासाठी एक हॉटेलमध्ये चर्चा झाली होती. पोलिसांनी त्या हॉटेलचं सीसीटीव्ही फुटेजही जप्त केलं आहे. याच ठिकाणी सिया आणि चेतन यांनी कथित कॉन्ट्रॅक्ट किलरची भेट घेतल्याचा दावा केला जात आहे.
दोघांनी विवाह केल्याचे कुठलेही पुरावे नाहीत
सिया आणि चेतन यांनी अगोदरच लग्न केलं होतं, असा दावा केला जात होता. याविषयीदेखील आता नवी माहिती समोर आली आहे. सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यात विवाहबद्दल फक्त फोन वर चर्चा झालेली आहे. प्रत्यक्षात कुठल्या ही पद्धतीने दोघांमध्ये विवाह झालेला नाही. दोघांनी विवाह केल्याचे कुठलेही पुरावे समोर आले नसल्याची माहिती आहे. राजस्थान येथील खाटूश्याम मंदिरालाही पुणे ग्रामीण पोलिसांनी भेट दिली. डिसेंबर 2025 मध्ये सिया आणि चेतनने राजस्थानची ट्रिप केली होती. याच ट्रिपमध्ये त्यांनी लग्न केल्याचे म्हटले जात होते. परंतु सिया आणि चेतनविरोधात राजस्थानमध्ये कुठलेही पुरावे मिळालेले नाहीत.
जपानी व्हिडीओ पाहून…
तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. अटकेनंतर पोलिस चौकशीतून बचाव करण्यासाठी सिया आणि चेतन यांनी तब्बल दोन तासांचा जपानी व्हिडिओ पाहिल्याचं समोर आलं आहे. चौकशीदरम्यान शांत कसं राहायचं आणि प्रश्नांना कशा पद्धतीने उत्तर द्यायचं, याबाबत या व्हिडिओमध्ये मार्गदर्शन करण्यात आलं होतं. पोलिसांनी या दोन्ही व्हिडिओंच्या लिंकही सिया आणि चेतन यांच्या वेब हिसस्ट्रीमधून जप्त केल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात आणखी कोणकोणते खुलासे होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.