Mumbai Pune Expressway Traffic Update : 32 तासांनंतर रस्ता मोकळा झाला अन् पुन्हा…; लोणावळ्यात असं काय घडलं?

पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर लोणावळ्याजवळ सिमेंटचा कंटेनर बंद पडल्याने भीषण वाहतूक कोंडी झाली आहे. २० किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असून प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

Mumbai Pune Expressway Traffic Update : 32 तासांनंतर रस्ता मोकळा झाला अन् पुन्हा...;  लोणावळ्यात असं काय घडलं?
Pune-Mumbai Expressway Traffic Update
| Updated on: Feb 05, 2026 | 10:47 AM

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर (Mumbai Pune Expressway) प्रवाशांच्या अडचणी थांबण्याचे नाव घेत नाहीत. खंडाळा घाटातील अडथळे दूर होऊन ३२ तासांनंतर मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील वाहतूक पुन्हा सुरु झाली. त्यातच आता एक मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यातच आता लोणावळ्याजवळ सिमेंटचा कंटेनर बंद पडल्याने पुन्हा एकदा वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. लोणावळ्यापासून मागे तब्बल २० ते २२ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा झाल्याचे पाहायला मिळत आहे.

नेमकी परिस्थिती काय?

मिळालेल्या माहितीनुसार, लोणावळा परिसरात एक सिमेंटचा कंटेनर तांत्रिक बिघाडामुळे रस्त्यातच बंद पडला. यामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे मंदावली आहे. महामार्ग पोलीस आणि आयआरबीची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. क्रेनच्या साहाय्याने हा कंटेनर बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, तोपर्यंत वाहनांचा ओघ वाढल्याने वाहतूक कोंडीत भर पडली आहे.

रात्रभर वाहनातच मुक्काम

खंडाळा घाटातील ३२ तासांच्या खंडानंतर रात्री उशिरा वाहतूक सुरू करण्यात आली होती. मात्र, अनेक वाहनचालकांना याची कल्पना नसल्याने आणि प्रचंड कोंडीमुळे वैतागलेले चालक आपल्या वाहनातच झोपून गेले होते. सकाळी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करताना पोलिसांना या वाहनचालकांना झोपेतून उठवून गाड्या पुढे नेण्यास सांगावे लागले.

सध्या लोणावळ्यापासून २० किलोमीटर आधीपासूनच वाहने अडकून पडली आहेत. त्यामुळे परिस्थिती इतकी गंभीर आहे की गेल्या दोन तासांत अनेक वाहने जेमतेम दोन किलोमीटर पुढे सरकू शकली आहेत. मावळ परिसरातून एक्सप्रेस वेवर येणाऱ्या प्रवाशांना या भीषण कोंडीचा सामना करावा लागत आहे. लोणावळ्याजवळ अजूनही ५ ते १० किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा कायम आहेत.

दीड लाख वाहनं अडकली

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ३ फेब्रुवारीपासून सुमारे २५ किमीपर्यंत दीड लाख वाहने अडकली होती. यावेळी प्रवाशांचे अन्न, पाणी आणि मूलभूत सुविधांअभावी प्रचंड हाल झाले होते. यावेळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने काही काळ मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद केली होती. तर बुधवारी सकाळपासून टोल वसुलीही थांबवण्यात आली होती. या कोंडीचा मोठा फटका बस सेवेला बसला आहे. एसटी महामंडळाच्या १६३ हून अधिक बसेस विविध विभागांत अडकल्या होत्या. ज्यामुळे ई-शिवनेरीसह १३९ बस फेऱ्या रद्द कराव्या लागल्या, अशी माहिती आता समोर येत आहे.