Pune Nasrapur Case: नसरापूर घटनेतील पीडित मुलीचा मृत्यू ॲस्फिस्कियामुळे; म्हणजे नेमकं काय?

Pune Nasrapur Case: नसरापूर घटनेतील पीडित मुलीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबद्दलची धक्कादायक माहिती पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून उघडकीस आली आहे. ससून रुग्णालयाने हा रिपोर्ट पोलिसांकडे सोपवला आहे.

Pune Nasrapur Case: नसरापूर घटनेतील पीडित मुलीचा मृत्यू ॲस्फिस्कियामुळे; म्हणजे नेमकं काय?
Pune Nasrapur Case
Image Credit source: Instagram
| Updated on: May 05, 2026 | 1:12 PM

नसरापूर घटनेतील पीडित मुलीचा मृत्यू हा ॲस्फिस्कियामुळे (Asphyxia) झाला असल्याची माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे. ॲस्फिस्किया म्हणजे श्वास कोंडणं, याच कारणामुळे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. ससून रुग्णालयाने हा अहवाल पोलिसांकडे सोपवला आहे. याप्रकरणी तीन सरकारी वकिलांच्या नावांची शिफारस करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांकडून राज्य सरकारला तीन जणांची नावं पाठवण्यात आली आहेत. ॲडव्होकेट अजय मिसर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. आज (मंगळवार) संध्याकाळपर्यंत सरकारी वकिलांचं नाव जाहीर होण्याची शक्यता आहे.

ॲस्फिस्किया म्हणजे काय?

  • ॲस्फिस्किया म्हणजे शरीरातील ऑक्सिजनचा पुरवठा बंद होऊन श्वास घेण्याची प्रक्रिया बिघडणं.
  • यामुळे मेंदू, इतर अवयवांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही, त्यामुळे व्यक्तीच्या जिवाला धोका निर्माण होतो.
  • श्वासात अडथळा आल्याने किंवा ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्याने शरीरात ऑक्सिजनची तीव्र कमतरता निर्माण होऊन अनेकदा बेशुद्धी येते किंवा मृत्यू ओढावतो.

दरम्यान पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथं साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणावरून विरोधकांनी गृह विभागावर जोरदार टीका केली आहे. या प्रकरणात आरोपीने याआधी गुन्हा केल्याचं माहीत असूनही पोलिसांनी ही माहिती न्यायालयात न दिल्याने या घटनेची चौकशी महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी नेमून करावी, अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. या प्रकरणाचा जलदगतीने तपास करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस दलाने सहा अधिकाऱ्यांचं पथक तयार केलं आहे.

पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात साडेतीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी 1 मे रोजी उघडकीस आली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. संतप्त ग्रामस्थांनी शुक्रवारी रात्री नसरापूरजवळचा पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखून धरला. तसंच शनिवारी मोर्चा काढून कडकडीत बंद पाळला.

या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळेला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याविरुद्ध हत्या, बलात्कार, बालकांचं लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 65 वर्षीय भीमराव कांबळेविरोधात याआधीही विनयभंग आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता.

Follow Us