मोठी बातमी! पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात बॉम्ब? संपूर्ण परिसर केला रिकामा
पुण्यात पुन्हा शिवाजीनगर कोर्टात बॉम्ब ठेवल्याची चर्चा होत आहे. या चर्चेनंतर संपूर्ण न्यायालय खाली करण्यात आले. संबंधित चर्चेमुळे काही काळासाठी गोंधळ उडाला होता.

Pune Court Bomb Threat : गेल्या काही दिवसांपासून पोलीस, सुरक्षा व्यवस्थेपुढे आव्हान निर्माण करणाऱ्या बाबी घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी राज्यातील वेगवेगळी न्यायालये बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. मेलद्वारे ही धमकी मिळाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. ही धमकी प्राप्त होताच सर्व यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. दरम्यान, आता पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील कोर्टात आता बॉम्ब असल्याची चर्चा सुरू झाल्याने एकच खळबळ उडाली. या चर्चेमुळे संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला.
पुण्यातील न्यायालयात काय घडलं?
समोर आलेल्या माहितीनुसार पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात नेहमीप्रमाणे दैनंदिन कामकाज चालू होते. परंतु अचानक या कोर्टात बॉम्ब ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला. बघता बघता ही चर्चा संपूर्ण न्यायालय परिसरात पसरली. ही चर्चा सर्वत्र सुरू झाल्याने तपास यंत्रणा सतर्क झाल्या. तपास यंत्रणा तसेच पोलिसांनी शिवाजीनगर कोर्ट परिसर खाली करण्यास सांगण्यात आले. ही सूचना मिळताच सगळे वकील न्यायालयाबाहेर गेले. गेल्या आठवड्यात बॉम्ब ठेवल्याचा मेल आल्याने अशाच पद्धतीने कोर्ट खाली करण्यास सांगितलं होतं. आता पुन्हा एकदा कोर्टात बॉम्ब असल्याची चर्चा सुरू झाल्याने न्यायालय परिसर रिकामा करण्यात आला.
तपास यंत्रणा सतर्क झाल्या
दरम्यान, कोणतीही अघटीत घटना घडू नये यासाठी पोलिसांनी तातडीने आपला तपास सुरू खेला आहे. पुण्यातील पोलीस, तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. आतापर्यंत तरी न्यायालय परिसरात बॉम्ब असल्याचे समोर आलेले नाही. परंतु यंत्रणेकडून सतर्कता बाळगली जातेय.
याआधी काय धमकी आली होती?
याआधी संपूर्ण राज्यभरातील न्यायालयांना बॉम्बने उडवून देऊ, अशा धमकीचा थेट मेल आला होता. या धमकीमुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. या धमकीनंतर सर्वत्र तपास करण्यात आला होता. परंतु त्यात काहीही तथ्य नसल्याचे नंतर समोर आले. पोलीस धमकी देणाऱ्याच्या शोधात आहेत. अशा प्रकारच्या धमक्या देणारे कोण आहेत? हे आम्ही लवकरात लवकर शोधून काढू, असे आश्वासन पोलिसांनी दिलेले आहे.