
पुण्यात वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याचे पाहायला मिळत आहे. इंजिनियन असलेल्या एका विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. महिलेच्या सासरच्या मंडळींनी अनेक मागण्या केल्या होत्या. या मागण विवाहित महिला दीप्ती चौधरीच्या कुटुंबियांनी पूर्ण देखील केल्या. पण दीप्तीचा सतत अपमान करणे, तिला घालून पाडून बोलणे या सर्वाला कंटाळून तिने आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येने पुण्यात खळबळ माजली आहे. आता महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दीप्तीच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे.
या प्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. दीप्ती चौधरीने आत्महत्या केल्यानंतर उरुळी कांचन पोलिस आणि रुपाली चाकणकर कुटुंबियांच्या भेटीला गेल्या आहेत. त्यांनी दीप्तीच्या कुटुंबीयांच्या मागण्या ऐकून घेतल्या. राजकीय हस्तक्षेप वाढत असल्यामुळे आरोपींवर कारवाई होत नाही असा आरोप दीप्तीच्या कुटुंबियांनी केला आहे.
रुपाली चाकणकर काय म्हणाल्या?
रुपाली चाकणकर दीप्ती चौधरीच्या कुटुंबियांशी बोलताना म्हणाल्या, कुठल्याही महिलेला किंवा लेकीला त्रास झाला तर तिने तातडीने कळवायला हवे. आपण ठामपणे तिच्या पाठीशी आपण उभे राहायला हवे. तुम्ही पोलिसांकडे तक्रार दाखल केली त्यासाठी अनेक पथकं आहेत. सासरी नांदणाऱ्या लेकीला त्रास झाला तर तिच्यासाठी काय? तर तिच्यासाठी काही व्यासपिठ आहेत. वन स्टॉप सेंटर पासून अगदी अगदी तिचे आणि तिच्या कुटुंबियांचे काऊंसिलिंग करणे, तिला वकील देण्यापासून शेवटच्या क्षणापर्यंतची तिची लढाई लढण्यासाठी मोफत वकील असतात. हे सर्व गोपनिय ठेवलं जातं. अगदी आई-वडिलांशिवाय कोणालाही माहिती नसतं. ती वन स्टॉप सेंटरमध्येही जाऊन तक्रार करु शकते.
पुढे त्या म्हणाल्या, आमची टीम वेगळ्या पद्धतीने काम करते. कायदा हा खूप कठोर आहे. कायद्याच्या चौकटीतून या सगळ्या प्रक्रिया होत राहतात. महाराष्ट्रातील कायदा हा भारतातील सर्वात सक्षम काम करतो. म्हणून तुम्हाला काही शंका असतील तर जरुर सांगा. या आधीचे दोन आरोपी आपल्या पीसीमध्ये आहेत. आपणच आपल्या लेकींच्या पाठीमागे ठामपणे उभे राहू. आता आपणच ही शपथ घेऊ.
नेमकं प्रकरण काय?
ही संतापजनक घटना पुण्यातील उरुळी कांचन तालुक्यातील सोरतापवाडी येथे घडली आहे. विवाहीत महिला दीप्ती मगर-चौधरी ही इंजिनिअर होती. लग्न झाल्यानंतर वर्षभर सर्वकाही सुरळीत होते. पण नंतर सासरच्या मंडळींनी 10 लाखांची मागणी केली. नंतर गाडी मागितली. तसेच दीप्तीच्या मनाविरुद्ध जाऊन गर्भलिंग तपासणी केली. दुसरीही मुलगी असल्याचे कळाल्यानंतर तिला गर्भपात करायला लावला.