विमानतळ बारामतीला पळवल्याचा शिवतारेंचा आरोप, अजित पवार म्हणतात ‘विषय खूप पुढे गेलाय’

| Updated on: Jan 25, 2021 | 4:18 PM

शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी पुरंदरचं विमानतळ बारामतीला पळवलं जातं असल्याचा आरोप केला. त्यांच्या या आरोपानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरंदर विमानतळावर आपली भूमिका स्पष्ट केली.

विमानतळ बारामतीला पळवल्याचा शिवतारेंचा आरोप, अजित पवार म्हणतात विषय खूप पुढे गेलाय
Follow us on

पुणे : शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी पुरंदरचं विमानतळ बारामतीला पळवलं जातं असल्याचा आरोप केला. त्यांच्या या आरोपानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरंदर विमानतळावर आपली भूमिका स्पष्ट केली. पुरंदर विमानतळाची जागा अद्याप निश्चित झालेली नाही, मात्र, विमानतळ पुन्हा खेडला नेणं अवघड असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी विमानतळाचा विषय खूप पुढे गेलाय, असाही सूचक इशारा केला (Ajit Pawar comment on allegations of Vijay Shivtare over Purandar Airport).

अजित पवार म्हणाले, “पुरंदर विमानतळाची जागा अजून निश्चित नाही. आता विमानतळ पुन्हा खेडला नेणं अवघड आहे. विमानतळाचा विषय पुढे गेलाय.” एकूणच पुणे जिल्ह्यातील पुरंदरच्या प्रस्तावित विमानतळावरून आता महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची चिन्ह दिसत आहेत. पुरंदर येथे प्रस्तावित असणारे विमानतळ बारामतीत हलवण्याचा डाव शरद पवार आणि काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांचा असल्याची टीका शिवसेनेचे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केला होता. तसेच कुठल्याही परिस्थितीत पुरंदरचे विमानतळ बारामतीला हलवू देणार नाही, असा इशाराही विजय शिवतारे यांनी दिला.

विजय शिवतारे म्हणाले होते, “असा कुठलाही निर्णय झाल्यास जिल्ह्यात मोठं आंदोलन उभं करू. पुरंदरमधील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाची जागा बदलून ते बारामतीच्या सीमेजवळ नेऊन ठेवणे, हे मोठे षडयंत्र आहे. विमानतळाची आधीची पारगाव आणि 7 गावांची जागा बदलून नव्याने रिसे, पिसे, पांडेश्वर आदी गावांमधील म्हणजेच पुरंदर तालुक्‍याची जागा घ्यायची आणि विमानतळाचे प्रवेशद्वार बारामतीच्या बाजूला करून तिकडचा विकास साधायचा.”

“बारामतीकडे प्रवेशद्वार करुन तिकडला विकास करायचा आणि विमानतळाच्या मागे पुरंदरमध्ये झोपडपट्टी होऊन सर्वांगिण विकासाची संधी जाणार आहे. त्यामुळे हे षडयंत्र आपण जनतेला बरोबर घेऊन हाणून पाडण्यास सिद्ध आहोत,” असा इशारा पुरंदरचे शिवसेनेचे माजी आमदार, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिलाय.

नायगाव ग्रामस्थांचाही विमानतळाला विरोध

पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील नायगाव ग्रामस्थांची विमानतळाला विरोध केलाय. त्यांनी या संदर्भात नुकतीच बैठक घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी शेतकऱ्यांनी विमानतळ विरोधात मनोगते व्यक्त करून विमानतळ विरोधात घोषणाबाजी केली. आम्हाला भकास करून विकास नको आहे अशी भूमिका यावेळी शेतकऱ्यांनी घेतली.

पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील रिसे, पिसे, राजुरी, पांडेश्वर, नायगाव, मावडी, पिंपरी या परिसरात विमानतळ होत असल्याच्या चर्चा आहेत. त्यावर कोणत्याही परिस्थितीत विमानतळासाठी जमिनी देणार नाहीत अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतलीय. यासाठी राजुरी येथे सर्व शेतकऱ्यांची बैठक झाली. यावेळी शेतकऱ्यांनी प्रस्तावित विमानतळास तीव्र विरोध दर्शविला.

पुण्यातील नव्या पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाच्या प्रक्रियेला ब्रेक

पुण्यातील नव्या पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाच्या प्रक्रियेला ब्रेक लागलाय. भूसंपादनात येणाऱ्या सात गावांना काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांचा विरोध आहे. यावर विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले, “भूसंपादन केल्यानंतर परताव्याची रक्कम किती असणार? याबाबत सरकारचं कोणतंही स्पष्टीकरण नाही. सरकार निधीबाबत स्पष्टता देतं नाही तोपर्यंत भूसंपादन करणं अशक्य आहे. विमानतळ प्रकल्पासाठी 6 हजार कोटींचा खर्च येणार आहे. सात गावांमधील 2 हजार 832 हेक्टर जागा संपादित केली जाणार आहे. मात्र गेल्या महिन्यात झालेल्या अजित पवारांच्या बैठकीत प्रकल्पग्रस्तांना द्यायच्या मोबदल्यात कोणत्याही पर्यायावर शिक्कामोर्तब झालेलं नाहीये. त्यामुळे भूसंपादन प्रक्रीया लांबणीवर आहे.”

हेही वाचा :

पुरंदरचं प्रस्तावित विमानतळ बारामतीला हलवण्याचा पवारांचा डाव, विजय शिवतारेंचा हल्लाबोल

विजय शिवतारेंची टिवटिवच बंद केली : अजित पवार

2014 ला पवार कुटुंबाची धाकधूक वाढवणारे तीन विधानसभा मतदारसंघ

व्हिडीओ पाहा :

Ajit Pawar comment on allegations of Vijay Shivtare over Purandar Airport