
पुणे | 9 ऑक्टोंबर 2023 : केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी आयोगाने मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगाना आणि मिझोराम या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मिझोराममध्ये एकाच टप्प्यात 7 नोव्हेंबरला मतदान होणार आहे तर छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात मतदान 7 नोव्हेंबर आणि 17 नोव्हेंबर रोजी मतदान होईल. मध्यप्रदेशातही 230 जागांसाठी 17 नोव्हेंबर रोजी तर तेलंगनात 30 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. राजस्थानमध्ये 23 नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. यावेळी नागालँडमधील एका पोटनिवडणुकीची घोषणा झाली.
केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी जाहीर केलेल्या कार्यक्रमात पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून नागालँडमधील एका पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली. मात्र महाराष्ट्रातील पुणे आणि चंद्रपूर लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर केली नाही. यामुळे आता राज्यात लोकसभेची पोटनिवडणूक होणार नाही, ही स्पष्ट झाले आहे. पुणे आणि चंद्रपूर लोकसभेसाठी सरळ 2024 मध्येच निवडणूक होणार आहे.
पुण्याची जागा मार्च महिन्यापासून रिक्त आहे. गिरीश बापट यांचे 23 मार्च 2023 रोजी निधन झाले. त्यानंतर या ठिकाणी पोटनिवडणूक होईल, अशी अपेक्षा होती. परंतु ही जागा रिक्तच राहिली. तर चंद्रपूर लोकसभेची जागा ही बाळू धानोरकर यांच्या निधनामुळे रिक्त झाली आहे. त्याचे 30 मे 2023 रोजी निधन झाले होते. नागालँडमधील तापी विधासभा मतदारसंघतील आमदार नको वांगो यांचेही निधन झाले होते. त्या रिक्त जागेवर निवडणूक जाहीर करण्यात आली. परंतु पुणे, चंद्रपूर लोकसभेसाठी निवडणूक जाहीर झाली नाही. म्हणजेच आता राज्यात लोकसभा निवडणूक होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.
गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा पोटनिवडणूक होण्याची शक्यता होती. त्यामुळे अनेक पक्षांनी तयारी चालवली होती. भाजपसह सर्वच पक्षातील इच्छुकांनी तयारी सुरु केली होती. अनेक इच्छुकांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी भावी खासदार म्हणून बॅनर्स लावून घेतले. त्या बॅनर्सची चर्चा रंगली होती. त्यामुळे आता इच्छुकांना लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रतिक्षा करावी लागणार आहे.