पीडित महिलेची तक्रार हा राठोडांना टीआरपीचा विषय वाटतो का?, चित्रा वाघ भडकल्या; मुख्यमंत्र्यांना दिला ‘हा’ इशारा

| Updated on: Aug 13, 2021 | 4:41 PM

माझ्यावरील करण्यात आलेले आरोप चुकीचे असून मीडिया खात्री न करता या बातम्या चालवत आहेत, असं विधान शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांनी केलं होतं. (chitra wagh)

पीडित महिलेची तक्रार हा राठोडांना टीआरपीचा विषय वाटतो का?, चित्रा वाघ भडकल्या; मुख्यमंत्र्यांना दिला हा इशारा
Chitra Wagh And Sanjay Rathod
Follow us on

पुणे: माझ्यावरील करण्यात आलेले आरोप चुकीचे असून मीडिया खात्री न करता या बातम्या चालवत आहेत, असं विधान शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांनी केलं होतं. त्यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे. पीडीत महिलेची तक्रारही राठोडांना टीआरपीचा विषय वाटतो का? हा सत्तेचा माज नाही तर काय आहे? असा सवाल करतानाच मुख्यमंत्र्यांना रक्षाबंधन निमित्त राख्या पाठवल्या जाणार आहेत, असं चित्रा वाघ यांनी सांगितलं. (BJP leader chitra wagh demand action against sanjay rathod)

चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन राठोड यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला. यवतमाळ येथील तरुणीने गंभीर आरोप केले आहेत. पोलीस अधिक्षकांकडे या महिलेने पोस्टाने तक्रार केली आहे. शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड यांच्यावर हे आरोप करण्यात आले आहेत. यवतमाळच्या एसपींनीही तक्रार आल्याचं मान्य केलं आहे. पण महिलेची तक्रार येऊनही तिचा अजून जबाब नोंदवण्यात आला नाही. तिला कोणी विचारणाही केली नाही. पीडित महिलेने संजय राठोड यांनी पतीला नोकरीवर कायम ठेवण्यासाठी शरीरसुखाची मागणी करत शारीरिक, मानसिक छळ केल्याचे तक्रारीत म्हटलंय. तर माजी मंत्र्याला अशा न्यूज म्हणजे टीआरपीची न्यूज वाटते. राठोड यांचं विधान धक्कादायक आहे. ही कसली मग्रुरी आहे. हा सत्तेचा माज आहे, असं वाघ म्हणाल्या.

पोलीस काय करतात ते बघायचंय

या तक्रारीत आरोपींचे स्पष्ट नाव आहे. तिने त्यात आपबिती सांगितली आहे, पीडीतीने मदतीची मागणी केलीय. दोन महिन्यांनी फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आला, पोलिसांनी का अजून कारवाई केली नाही, असं सांगतानाच हा तोच संजय राठोड आहे. दोन नावे वेगळे नाहीत. तेव्हाचा कॉल सार्वजनिक करा म्हटलं होते. एकाही प्रश्नाला उत्तर मिळालं नाही. आता यवतमाळचे पोलीस काय करताय हे बघायचे आहे, असं त्यांनी सांगितलं. तसेच या प्रकरणात स्यूमोटो कारवाई होत नाही, हे पोलिसांनी लिहून द्यावं. त्यांनी चालढकल करू नये, असंही त्या म्हणाल्या.

शिवसेना, संजय आणि महिला…

पीडित महिलेने बिनबुडाचे आरोप केलेले नाहीत. तिने रितसर पत्रं लिहिलं आहे, असं सांगतानाच पीडित महिलेशी अद्याप बोलणं झालं नसल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवसेना, संजय आणि महिला हे समीकरण आहे, हे त्यांनाच विचार, असा चिमटाही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना काढला.

गृहमंत्री दखल घेत नाही

यावेळी त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यावरही प्रचंड नाराजी व्यक्त केली. गृहमंत्र्यांनी याप्रकरणी दखल घेणं अपेक्षित आहे. पण दुर्देवाने त्यांच्याकडून दखल घेतली जात नाही. महिला प्रश्नावर वळसे-पाटील यांना पत्रं दिलं होतं. त्यावर अजून उत्तर आलेलं नाही. जे करायला हवं ते केलं जात नाही. गृहखाते म्हणजे आंधळं दळतंय आणि कुत्रे पीठ खातंय असं झालं आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

उद्धव ठाकरे चांगली व्यक्ती, पण…

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोले लगावले. उद्धव ठाकरे ही चांगली व्यक्ती आहे. पण मुख्यमंत्रीपदावर गेल्यापासून काही तरी बदल झाला आहे, असा टोला त्यांनी लगावला. परत संजय राठोड दोषी आढळल्यास अशी घाण कोणत्याच सभागृहात नको, असंही त्या म्हणाल्या.

त्या महिलेच्या संपर्कात

यावेळी त्यांनी गजनान काळे प्रकरणावरही प्रतिक्रिया दिली. या प्रकरणात मी तक्रारदार महिलेच्या संपर्कात आहे. डीसीपी झोनच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली जात आहे. सगळेच एका रांगेत आहेत. न्याय मिळवण्याचा प्रयत्न करू, असं त्या म्हणाल्या.

मुख्यमंत्र्यांना राख्या पाठवणार

पोलीस कारवाई का करत नाही. त्या महिलेचा जबाब का नोंदवला जात नाही. पीडितेच्या आत्महत्येची वाट पाहिली जात आहे का?, असा संतप्त सवालही त्यांनी केला. कायदे कुणासाठी बनविले आहेत? पोलीस दलातील महिलांवर अत्याचार होत आहेत. नागपूरमधील एक महिला पोलीस नाईक आहे, तिनेही तिच्यावरील अत्याचाराची तक्रार केली. पण आरोपी अकोल्यात पीएसआय आहे. त्याच्यावर एफआयआर दाखल करावा. सरकार मुर्दाड असले तरी न्यायलायवर आमचा विश्वास आहे, असं सांगतानाच रक्षाबंधन जवळ आलंय. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील बहिणीची काळजी घ्यावी. आम्ही मुख्यमंत्र्यांना राखीचे धागे पाठवणार आहोत, असं त्या म्हणाल्या. मुख्यमंत्री त्यांच्या आमदारानांच भेटत नाहीत तर मला काय भेटणार? असा सवालही त्यांनी एका प्रश्नाचं उत्तर देताना केला. (BJP leader chitra wagh demand action against sanjay rathod)

 

संबंधित बातम्या:

शरीरसुखाची मागणी केल्याची महिलेची गंभीर तक्रार; संजय राठोड मीडियासमोर आले, म्हणाले…

संजय राठोडांच्या अडचणीत वाढ, शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी महिलेची पोलिसात तक्रार

विवाहबाह्य संबंध, बायकोला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप असलेले गजानन काळे नेमके कोण आहेत?

(BJP leader chitra wagh demand action against sanjay rathod)