Pune crime : वाहनांची तोडफोड करणाऱ्यांना चतु:श्रृंगी पोलिसांचा दणका; तिघांना अटक करत लावला ‘मकोका’

| Updated on: Jun 18, 2022 | 4:48 PM

चॉपर आणि इतर शस्त्रे घेऊन आलेल्या या टोळीने काही दिवसांपूर्वी पहाटे सेनापती बापट रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयासमोर आणि आजूबाजूच्या परिसरात 12 कार, तीन दुचाकी, एक ऑटो रिक्षा आणि तीन चाकी टेम्पोची तोडफोड केली होती.

Pune crime : वाहनांची तोडफोड करणाऱ्यांना चतु:श्रृंगी पोलिसांचा दणका; तिघांना अटक करत लावला मकोका
चतु:श्रृंगी पोलीस स्टेशन (संग्रहित छायाचित्र)
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : वाहनांची तोडफोड करणाऱ्यांच्या मुसक्या चतु:श्रृंगी पोलिसांनी (Chatushrungi Police Station) आवळल्या आहेत. गुरूवारी 6 मे रोजी सेनापती बापट रोड आणि लगतच्या परिसरात 17 वाहनांची तोडफोड करणाऱ्या चार गुन्हेगारांच्या टोळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मकोका म्हणजेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार  (Maharashtra Control of Organised Crime Act) पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी विमाननगर येथील यश हेलकर (21) आणि त्याचे तीन साथीदार शुभम खंडागळे (21), साईनाथ पाटोळे (23) आणि विनायक कापडे (20) यांना विमाननगर येथून अटक करण्यात आली आहे. चतु:श्रृंगी पोलिसांचे वरिष्ठ निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांनी सांगितले, की हेलकरवर खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी व वाहन चोरी असे आठ गुन्हे (Crime) दाखल आहेत. त्याच्या इतर तीन साथीदारांवरही गंभीर गुन्हे दाखल आहेत.

टोळ्यांच्या आवळणार मुसक्या

चॉपर आणि इतर शस्त्रे घेऊन आलेल्या या टोळीने काही दिवसांपूर्वी पहाटे सेनापती बापट रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयासमोर आणि आजूबाजूच्या परिसरात 12 कार, तीन दुचाकी, एक ऑटो रिक्षा आणि तीन चाकी टेम्पोची तोडफोड केली होती. या टोळीने मंगळवार पेठ परिसरात आणखी तीन गाड्यांची तोडफोड केली. या टोळक्याने पार्टी करून पळ काढला आणि मौजमजेसाठी वाहनांचे नुकसान केल्याचे तपासात समोर आले आहे. प्रतिबंधात्मक कारवाई करूनही गुन्हेगारी कारवाया करत राहिल्याने वाघचवरे यांनी टोळीविरुद्ध मकोका कायद्यानुसार गुन्हा दाखल करणे सुरू केले आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांनी या गटाच्या विरोधात हा प्रस्ताव मंजूर केला.

प्रकार वाढले

पार्किंग तसेच रस्त्यालगतच्या वाहनांची तोडफोड करण्याचे प्रकार मागील काही दिवसांपासून पुण्यात वाढले आहेत. पुण्यातील कल्याणीनगर, जनता वसाहत, कोथरूड अशा विविध ठिकाणी टोळके सक्रीय असून अशा समाजकंटकांचा स्थानिकांना त्रास होत आहे. आता यातील एका घटनेत तर चतु:श्रृंगी पोलिसांनी कारवाई करत मोक्कानुसार गुन्हा दाखल केला आहे. सध्या तरी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. यात आणखी कोणी सहभागी आहेत का, याचा तपास पोलीस करीत आहेत.