नाकात ऑक्सिजनच्या नळ्या घालून धंगेकर यांच्या विरोधात प्रचार; आता गिरीश बापट यांचा आशीर्वाद देत धंगेकर यांना ‘हा’ सल्ला

गिरीश बापटांनी आयुष्यात कुरघोडीचं राजकारण केलं नाही. त्यांची निवडणूक आणि आताच्या निवडणूकीत फरक आहे. गिरीश बापटांना मी निवडणुकी आधी भेटलो नाही. कारण त्यांच्याविषयी मनात संशयाची पाल चुकचुकायला नको.

नाकात ऑक्सिजनच्या नळ्या घालून धंगेकर यांच्या विरोधात प्रचार; आता गिरीश बापट यांचा आशीर्वाद देत धंगेकर यांना हा सल्ला
girish bapat
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Mar 03, 2023 | 1:16 PM

पुणे : कसबापेठ विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळविण्यासाठी भाजपने प्रचंड मेहनत घेतली होती. या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी भाजपने राज्यातील अर्धा डझन मंत्री मतदारसंघात कामाला लावले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रॅली आणि रोड शोचं आयोजनही करण्यात आलं होतं. हायटेक प्रचारात जराही कसूर केली नव्हती. एवढेच नव्हे तर काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना पराभूत करण्यासाठी खासदार गिरीश बापट यांनाही भाजपने मैदानात उतरवलं. नाकात ऑक्सिजनच्या नळकांड्या घालून बापट यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा प्रचार केला. मात्र, निवडणुकीत विजयी झाल्यानंतर धंगेकर यांनी बापट यांची भेट घेतली. तेव्हा बापट यांनी धंगेकरांना आशीर्वाद तर दिलाच पण मोलाचा सल्लाही दिला.

कसबापेठ विधानसभा निवडणुकीत विजय झाल्यानंतर काँग्रेसचे विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे खासदार गिरीश बापट यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतली. यावेळी गिरीश बापट यांनीही धंगेकर यांना वडीलकीचा सल्ला दिला. नियोजन कर आणि नियोजना प्रमाणे काम करं. तुला काही कमी पडणार नाही. काही अडचण आली तर माझा सल्ला घे, असं बापट म्हणाल्याची प्रतिक्रिया रवींद्र धंगेकर यांनी मीडियाशी बोलताना व्यक्त केली.

कुरघोडीचं राजकारण केलं नाही

गिरीश बापटांनी आयुष्यात कुरघोडीचं राजकारण केलं नाही. त्यांची निवडणूक आणि आताच्या निवडणूकीत फरक आहे. गिरीश बापटांना मी निवडणुकी आधी भेटलो नाही. कारण त्यांच्याविषयी मनात संशयाची पाल चुकचुकायला नको. त्यांच भविष्य भाजपात घडलं आहे. त्यामुळे निवडणूक काळात किंवा त्यापूर्वी त्यांना भेटलो नाही. आता निवडणूक संपली आहे. म्हणून त्यांना आता भेटलो. मला भेटणं गरजेचं होतं. ते ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांचा आशीर्वाद घेणं आवश्यक होतं, असं धंगेकर म्हणाले.

कसलेले राजकारणी

या भेटीत गिरीश बापट यांच्या प्रकृतीची चौकशी केली. त्यांनी मला मोलाचा सल्ला दिला. त्यांच्या सल्ल्यानुसार मी काम करेल. गिरीश बापट कसलेले राजकारणी आहेत. राजकारणाचा त्यांचा अभ्यास दांडगा आहे, असंही ते म्हणाले.

बापटांच्या कार्यालयाबाहेर बॅनरबाजी

दरम्यान, खासदार गिरीश बापटांच्या कार्यालयासमोरचं काँग्रेस कार्यकर्त्यांची बँनरबाजी केली आहे. कसबा गणपतीसमोर समोर असलेल्या बापटांच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या समोरचं बॅनरबाजी करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटलांनी विचारलेल्या हु इज धंगेकर? या प्रश्नाला धीस इज धंगेकर… या पोस्टरच्या माध्यमातूनचं प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. बापटांच्या कार्यालयासमोरचं हा बॅनर लावण्यात आल्याने चर्चांना उधाण आलं आहे.