
बालपण अगदी हालखीचं… लहानपणीच वडिलांचं छत्र हरपलं. पण आईने मोठ्या जिद्दीने काबाडकष्ट करून प्रकाशला PSI केलं. कर्तव्य बजावत असताना अकोले दुर्घटनेत वीरमरण आलं अन् प्रकाशच्या अशा अचानक जाण्याने त्यांच अख्खं गावं शोकसागरात बुडालं… ही कहानी आहे दौंड तालुक्यातील कौठडी गावच्या सुपुत्राची… आज अकोल्यातील प्रवरा नदी पात्रात SDRF च्या टीमकडून बजाव कार्य केलं जात होतं. मात्र त्यावेळी SDRF च्या टीमची बोट उलटली अन् या दुर्घटनेत तीन जवान शहीद झाले. यातील एक म्हणजे PSI प्रकाश शिंदे…
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात दोन तरूण काल प्रवरा नदी पोहण्यासाठी गेले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. या दोन तरूणांचा शोध घेण्यासाठी धुळ्यातील SDRF ची टीम दाखल झाली. मात्र SDRF च्या टीमचीच बोट बुडाली अन् या घटनेत पीएसआय प्रकाश शिंदे, पोलीस शिपाई राहुल पावरा, वैभव वाघ या तीन जवानांना वीरमरण आलं.
अकोले दुर्घटनेत शहीद झालेले पीएसआय प्रकाश शिंदे हे दौंड तालुक्यातील कौठडी गावचे. प्रकाश हे सामान्य कुटुंबातील… लहानपणीच वडिलांचं छत्र हरपलं. त्यामुळे प्रकाश यांना लहानपणापासूनच संघर्ष करावा लागला. घरात कुणीही उच्च शिक्षित नसताना प्रकाश यांनी मात्र शिक्षणाचा ध्यास घेतला. आई अन् भावडांची साथ, मेहनतीची तयारी, प्रबळ इच्छाशक्ती या जोरावर प्रकाश यांनी पोलीस खात्यात रुजू होण्याचं स्वप्न पाहिलं. आधी पोलीस शिपाई म्हणून ते पोलीस खात्यात जॉईन झाले. मात्र एवढ्यावरच न थांबता अधिकारी होण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं. 2023 ला ते एमपीएससी परीक्षा पास झाले. पोलीस उपनिरीक्षक(PSI) पदी त्यांची निवड झाली. 26/11 हल्यानंतर स्थापन झालेल्या फोर्स वन दलामध्ये कमांडो म्हणून त्यांनी काम केलं आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यात प्रवरा नदीमध्ये बुडालेल्या तरूणांना वाचवण्यासाठी आज कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आलं. त्यामुळे कौठडी या त्यांच्या गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पीएसआयपदी बढती होऊन एकच वर्ष झालेलं असताना अचानक वीरमरण आल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रकाश यांचे कुटुंबीय, त्यांचा मित्रपरिवार अन् अवघ्या कौठडी गावावर शोककळा पसरली आहे. दौंडमधील बल गट क्रमांक 5 इथे त्यांना सलामी देण्यात येणार आहे. त्यानंतर राञी 9.30 वाजता कौठडी या त्यांच्या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.