Pune : शेतात खोदलेल्या खड्ड्यात बुडून तीन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; पुण्यातल्या आंबेठाण गावातली घटना

| Updated on: Jul 12, 2022 | 6:00 PM

खेळता खेळता या डबक्यात ही मुले घसरली. त्यांना तत्काळ रुग्णवाहिकेद्वारे प्राथमिक उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Pune : शेतात खोदलेल्या खड्ड्यात बुडून तीन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; पुण्यातल्या आंबेठाण गावातली घटना
शेतात खोदलेल्या याच खड्ड्यात बुडून तीन मुलांचा झाला मृत्यू
Image Credit source: tv9
Follow us on

चाकण, पुणे : आंबेठाण गावातील लांडगे वस्तीवर शेतातील खड्ड्यात बुडून तीन चिमुकल्या भावडांचा दुर्दैवी मृत्यू (Children Dead) झाला आहे. खेड तालुक्यातील आंबेठाण गावातील लांडगे वस्तीवर शेतात एका खासगी व्यक्तीने खड्डा उकरून ठेवला आहे. या खड्ड्यात पाणी साचले होते. त्या ठिकाणी खेळता खेळता तीन भावडांचा पाण्यात बुडून मृत्यू (Drowning) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहार येथील किशोर दास यांचे कुटुंब कामाच्या निमित्ताने लांडगे वस्ती येथे भाड्याने राहत होते. मृत्यू पावलेले तीन चिमुकले हे त्यांची अपत्ये होती. किशोर दास हे मूळ बिहार (Bihar) राज्यातील रहिवासी आहेत. त्यांना एकूण चार अपत्ये आहेत. त्यातील रोहित दास (वय 8), राकेश दास (वय 6), श्वेता दास (वय 4) अशी मृत पावलेल्या मुलांची नावे आहेत.

डॉक्टरांनी घोषित केले मृत

एका बेजबाबदार व्यक्तीने हा खड्डा करून ठेवल्याने हा मोठा अनर्थ झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनास्थळी मदत कार्याची टीम आणि महाळुंगे पोलीस चौकीचे पोलीस प्रशासन दाखल झाले. खेळता खेळता या डबक्यात ही मुले घसरली. त्यांना तत्काळ रुग्णवाहिकेद्वारे प्राथमिक उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तीन लहान भावंडे एकाच घरातील होती. दोन मुले आणि एक मुलगी यात मृत पावले आहेत.

हे सुद्धा वाचा

‘पालकांनी पाल्यांवर लक्ष ठेवावे’

मृतदेह शवविच्छेदनासाठी वायसीएम रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. पुढील तपास महाळुंगे पोलीस करत आहेत. दरम्यान, सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी पुराचीही स्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणच्या शाळा काही काळासाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. अशावेळी पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. त्यांना अशा वातावरणात शक्यतो बाहेर पडू देऊ नये. पाण्याची खोली कुठे किती असेल याचा अंदाज येत नाही. अशावेळी जास्त काळजी घ्यावी. अशाप्रकारच्या खड्ड्यांच्या बाजूला अडथळा असणे गरजेचे आहे, अशी खबरदारी घेण्याचे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.