Pune News : पुणे शहरात पाणी कपात होणार का? बैठकीत पालकमंत्र्यांनी काय घेतला निर्णय

Pune News : पुणे शहराला पाणी पुरवठा करणारी चारही धरण अजून शंभर टक्के भरलेली नाहीत. यामुळे शहरात पाणी कपात करावी का? यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी कालवा समितीची बैठक झाली. या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.

Pune News : पुणे शहरात पाणी कपात होणार का? बैठकीत पालकमंत्र्यांनी काय घेतला निर्णय
pune mahanagarpalika
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 03, 2023 | 9:17 AM

पुणे | 3 सप्टेंबर 2023 : पुणे शहरात यंदा पावसाळ्यात पाणी कपातीचे संकट होते. कारण पुणे शहराला पाणी पुरवठा करणारी सर्व धरणे शंभर टक्के भरली नाही. यासाठी कालवा समितीची बैठक बोलवण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रकांत पाटील होते. बैठकीत सर्व धरणांचा परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, यंदा पाऊस कमी झाला आहे. परंतु सध्या खडकवासला धरणात जलसाठा चांगला आहे. तसेच पवना आणि चासकमान धरण १०० टक्के भरली आहे. भामा आसखेडमध्येही जलसाठा आहे. यामुळे तूर्त पाणी कपात न करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढील महिन्याभरात पाऊस किती पडतो? हे पाहून पाणी कपातीचा निर्णय घेण्यात येईल.

पुणे परिसरात पाचशे किलो गांजा जप्त

पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून लोणीकंद परिसरातून तब्बल पाचशे किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. गांजा वाहतूक करणारी दोन वाहने ताब्यात घेण्यात आली आहे. यापूर्वी तस्करांच्या विरुद्ध मोहिम हाती घेत यापूर्वी कोट्यवधी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले होते. याप्रकरणी एका महिलेसह चौघांना ताब्यांत घेण्यात आले आहे. आंध्रप्रदेशातून हा गांजा आणण्यात आला होता.

पुणे मेट्रोमुळे पीएमपीचे प्रवासी वाढले

पुणे मेट्रोची सेवा सुरू झाल्यापासून प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. पुणे मेट्रोने सध्या दररोज सुमारे ६५ हजार नागरिक प्रवास करत आहेत. मेट्रोमुळे पीएमपीला मोठा फटका बसेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, पीएमपीच्या प्रवासीसंख्येत घट होण्याऐवजी वाढ झाली आहे. मेट्रो सुरू होण्यापूर्वी पीएमपीची दैनंदिन प्रवासी संख्या १२ लाख होती. ती आता १३ लाख झाली आहे. नागरिक आता सार्वजनिक वाहतुकीचा वापर करत असल्याचे दिसत आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये डोळ्यांची साथ आटोक्यात

पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये डोळ्यांची साथ आली होती. आता ही साथ आटोक्यात आली आहे. गेली दोन महिने डोळ्यांच्या साथीने नागरिक बेजार झाले होते. दोन महिन्यांत सात हजारापेक्षा जास्त जणांच्या डोळ्यांना बाधा झाली होती. आता रुग्णाचे प्रमाण कमी होत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

पिंपरी, चिंचवडमध्ये डेंगूच्या आळ्या, नऊ लाखांचा दंड

पिंपरी चिंचवड शहरात साडेपाच हजार ठिकाणी डेंगूच्या आळ्या आढळल्या. यामुळे एकूण नऊ लाखांचा दंड करण्यात आला आहे. ज्या ठिकाणी डेंगूच्या आळ्या आढळलेल्या त्या मालमत्तांकडून नऊ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. डेंगू आजाराला आळा बसवण्यासाठी डासांची उत्पत्ती स्थानके शोधण्याची मोहीम महापालिकेने घेतली आहे.