पुण्यात अजितदादांची अधिकाऱ्यांसोबत बैठक, चंद्रकांतदादांनाही बोलावणं धाडलं, लॉकडाऊनच्या हालाचालींना वेग

| Updated on: Mar 12, 2021 | 9:58 AM

पुण्यातील लॉकडाऊनबाबतचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. (Ajit Pawar meeting on Pune Lockdown and Corona cases)

पुण्यात अजितदादांची अधिकाऱ्यांसोबत बैठक, चंद्रकांतदादांनाही बोलावणं धाडलं, लॉकडाऊनच्या हालाचालींना वेग
ajit pawar chandrakant patil
Follow us on

पुणे : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर पुणे हे पुन्हा एकदा कोरोनाचे हॉटस्पॉट ठरतं का? अशी शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात लॉकडाऊन करायचा की नाही याबाबत आज निर्णय घेण्यात येणार आहे. पुण्यात आज उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमुळे पुण्यात लॉकाडाऊन लागण्याच्या हालाचलींनी वेग आला आहे. (Ajit Pawar meeting on Pune Lockdown and Corona cases)

विशेष म्हणजे या बैठकीपूर्वी भाजप नेते चंद्रकात पाटील यांनी अजित पवारांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्या दोघांमध्ये लॉकडाऊन, वाढता कोरोना या विषयांवर चर्चा केल्याचे बोललं जात आहे. तसेच पुण्यात लॉकडाऊन लावायचा की नाही याबाबतही त्यांच्यात चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुण्यात अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक

पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थिती कोरोना आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्त उपस्थितीत राहणार आहे. पुणे पालिकेच्या विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक होणार आहे. सकाळी 10 वाजता ही बैठक होईल. या बैठकीला पुण्यातील लॉकडाऊनबाबतचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

अजित पवारांनी आयोजित केलेल्या बैठकीत पुणे शहर, पुणे जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमधील कोरोनाचा आढावा घेतला जाणार आहे. या ठिकाणी किती कोरोना रुग्ण आहेत, मृत्यू किती आहे? याचा आढावा घेतला जाईल. सध्या पुण्यात 62 कंटेन्मेंट झोन आहेत. या झोनमध्ये कडक निर्बंध लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुण्यात कडक निर्बंध लावा मात्र लॉकडाऊन नको, पुणे व्यापारी महासंघाची मागणी

तर दुसरीकडे लॉकडाऊन नको, असा सूरही उमटत आहे. गेल्या वर्षभर कोरोनाने सगळ्यांनाच हैरान केलं आहे. त्यातही पुण्यात कोरोनाचा सर्वाधिक प्रुादुर्भाव पाहायला मिळाला. अगदी महाराष्ट्रातले सर्वाधिक कोरोना रुग्ण पुण्यात मिळाले. याच पार्श्वभूमीवर पुण्यात अतिशय कडक निर्बंध लादले गेले. कित्येक व्यापाऱ्यांची दुकाने पाच ते सहा महिने बंद होती. आता कुठे व्यवसाय पुन्हा रुळावर येतो ना येतो तोच पुन्हा एकदा कोरोनाने उसळी घ्यायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात कडक निर्बंध लावले तरी चालतील पण आता लॉकडाऊन नको, अशी विनंती पुणे व्यापारी महासंघाने अजित पवार यांच्याकडे केली आहे.

पुणे व्यापारी महासंघाने अजित पवार यांना यासंदर्भातलं एक पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये आपली व्यथा मांडत गेल्या वर्षभरातले व्यापाऱ्यांचे हाल त्यांनी पत्राच्या माध्यमातून अजित पवारांच्या कानावर घालण्याचा प्रयत्न केला आहे. तसंच दुकाने बंद असल्याने कोरोना प्रादुर्भावाच्या काळात व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं सांगत आता पुन्हा आमच्यावर लॉकडाऊनचा घाव घालू नका, अशी विनंती महासंघाने केली आहे.

पुण्यात लॉकडाऊनबाबत चर्चांना उधाण

पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. या बैठकीतून काय निर्णय घेतले जातात. पुण्यात लॉकडाऊनबाबत अनेक चर्चांना उधाण आले आहे, त्यामुळे आज लॉकडाऊन जाहीर केला जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे पुण्यात लॉकडाऊन लावायचा की नाही? याबाबत बैठक पार पडेल. या बैठकीनंतर पुण्यातील लॉकडाऊनबद्दलची माहिती समोर येईल.

पुण्यात कोरोनाची स्थिती काय?

पुण्यात कोरोनाने पुन्हा एकदा वर डोके काढले आहे. तीन ते चार महिने थोडीशी विश्रांती घेतल्यानंतर शहरांत कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर वाढायला सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्यापासून हा आकडा दररोज वाढतो आहे अर्थात कोरोनाबाधितांचा वाढता आलेख पाहायला मिळत आहे.

पुणे शहरात गुरुवारी नव्याने 1 हजार 504 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्याअगोदर बुधवारी पुण्यात 1 हजार 352 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली तर मंगळवारी 1 हजार 86 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली.

टेस्टिंग वाढवल्या, लसीकरणाने जोर धरला

यावरुन गेल्या तीन दिवसांत पुण्यात कोरोना किती वेगाने फोफावतोय, हे कळायला मदत होतीय. दुसरीकडे रुग्णसंख्या वाढत असताना पुण्यात पुन्हा एकदा टेस्टिंगची संख्यादेखील वाढवली आहे. तसंच लसीकरणाने देखील जोर धरला आहे.(Ajit Pawar meeting on Pune Lockdown and Corona cases)

संबंधित बातम्या :

पुण्यात कडक निर्बंध लावा मात्र लॉकडाऊन नको, अजित पवारांकडे ही मागणी कुणी केलीय पाहा…

राज ठाकरेंचं मिशन महानगरपालिका, पुण्यात पदाधिकाऱ्यांच्या भेटीसाठी, बैठका आणि बरंच काही!