
पुण्यात वाहन अपघाताचे सत्र सुरुच आहे. हिंजवडी येथे एका खाजगी बसच्या अपघातात पाच जण चिरडले गेले असून त्यात दोघा सख्या शाळकरी बहिण-भावाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यात वाहतूक वर्दळी आणि नियमांचे उल्लंघन करुन वाहने चालवली जात असल्याने सामान्य पादचाऱ्यांचे जीवन धोक्यात आले आहे. या अपघातात सख्या बहिण-भावाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
हिंजवडी आयटी पार्क परिसरात गेल्या काही दिवसांपासून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सर्वत्र चिंचा व्यक्त केली जात असतानाच पुन्हा हिंजवडीत खाजगी बसने पाच जणांना चिरडल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास दोघे सख्ये भाऊ बहिण रस्त्यावर जात असताना त्यांचा अशा प्रकारे अपघातात जागीच मृत्यू झाल्याने या अपघाताची तीव्रता किती मोठी होती याचा अंदाज येऊ शकतो.
आयटी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी ही बस पंचरत्न जवळ आल्यानंतर तिचा टायर फुटला आणि या बस अनियंत्रित होत रस्त्यावरील पादचाऱ्यांना चिरडत रस्त्याच्या कडेला थांबली. त्यामध्ये धक्कादायक म्हणजे या अपघातात दोन सख्या भावा बहिणीचा मृत्यू झाला आहे. त्यात अर्चना प्रसाद ( वय ८ ) आणि सुरज अशी या दुर्दैवी भावंडाची नावे असून ही मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत होती. ती नेहमी शाळा सुटल्यानंतर घरी जात होती त्यावेळी ती या अपघातात सापडली. या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
नुकताच पुण्यातील नवले ब्रिजवर दोन कंटेनरच्या अपघातात स्विफ्ट कारने पेट घेतल्याने त्यात आठ जणांचा मृत्यू झाला होता. साताराहून पुण्याला जाणाऱ्या मार्गावर भूमकर चौक ते नवले पुल परिसरात सायंकाळच्या सुमारास हा भीषण अपघात झाला होता. पुण्यातील वाहतूक कोंडी आणि अवजड वाहनांच्या नियमबाह्य वाहतूकीने वारंवार अपघात होत असून वाहतूकीला शिस्त नसल्याने हे होत असल्याची टीका होत आहे.