Girish Bapat : फडणवीस पुण्यातून उभे राहिले तर मला आनंदच, गिरीश बापट यांची प्रतिक्रिया तर राजकारणाचा स्तर घसरल्याबद्दल व्यक्त केली खंत

| Updated on: Aug 21, 2022 | 1:15 PM

राजकारणात आपली प्रतिमा आपणच जपायची असते. आता मात्र लोकांच्या मनातून राजकारणी उतरत चालले आहे, अशी प्रतिक्रिया गिरीश बापट यांनी दिली.

Girish Bapat : फडणवीस पुण्यातून उभे राहिले तर मला आनंदच, गिरीश बापट यांची प्रतिक्रिया तर राजकारणाचा स्तर घसरल्याबद्दल व्यक्त केली खंत
देवेंद्र फडणवीसांच्या लोकसभा उमेदवारी तसेच सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना गिरीश बापट
Image Credit source: tv9
Follow us on

अभिजीत पोते, पुणे : 2024 साली देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पुण्यातून जरी लोकसभेची उमेदवारी दिली तरी मला आनंदच होईल, अशी प्रतिक्रिया खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांनी दिली आहे. ते पुण्यात बोलत होते. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी नुकतीच केली होती. यासंदर्भात ब्राह्मण महासंघाचे गोविंद कुलकर्णी यांनी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पत्रही लिहिले होते. त्यावर विचारले असता, गिरीश बापट बोलत होते. उमेदवारी देणे हे राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांचे, नेत्यांचे काम आहे. संघटना उमेदवार ठरवत नाही. त्यांनी त्यांचा प्रचार करावा, असे गिरीश बापट म्हणाले. यावेळी त्यांनी राजकारणाचा (Politics) स्तर घसरत चालला असल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे. केवळ निवडणूक आणि सत्ता हेच ध्येय झाल्याचे ते म्हणाले.

‘कुठल्याही सरकारने एक निर्णय घेतला की दुसरा कोर्टात’

राज्यात दोन सरकार आली आणि दोन्ही सरकारांनी प्रभाग रचनेचा वेगवेगळा निर्णय घेतला. आता नवीन सरकार आल्यानंतर पुन्हा प्रभाग रचना बदलली आहे. यामध्ये निवडणूक आयुक्त, सरकार आणि कोर्ट अशा तिन्ही एजन्सी येतात. त्या महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुका कधी होतील, यामध्ये थोडासा गोंधळ आहे. कुठल्याही सरकारने एकही निर्णय घेतला की दुसरा कोर्टात जातो, असे गिरीश बापट म्हणाले.

‘शहर मोठे आहे खर्च होणारच’

प्रभाग रचनेच्या गोंधळात महापालिकेचे कोट्यवधी रुपये गेले यावर विचारले असता, निवडणुकीसाठी किती खर्च झाला याचा आकडा मला माहिती नाही, पण आपले शहर मोठे आहे. खर्च होणारच. पण अवास्तव खर्च झाला असेल, असे मला वाटत नाही, असेही बापट म्हणाले. सत्ता हातात आल्यावर सत्तेचा उपयोग किंवा दुरुपयोग कसा करायचा, हे त्या त्या वेळच्या राज्यकर्त्यांवर अवलंबून असते.

हे सुद्धा वाचा

‘राजकीय पातळी खालावली’

आघाडीचे सरकार होते, त्यावेळेस किरीट सोमैयांपासून नारायण राणेंपर्यंत जुने विषय काढून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला. राजकीय पातळी सध्या थोडी खालावलेली आहे. राजकारणाचा स्तरदेखील घसरला आहे. सामान्य जनतेला मात्र याच्याशी काही घेणे देणे नाही. जनतेच्या मनात सर्वच राजकारण्यांच्या बद्दल नाराजी असते. माझ्यासारखा माणूसदेखील आत्ताचे राजकारण बघून अस्वस्थ होतो.

काय म्हणाले गिरीश बापट?

‘आपली प्रतिमा आपणच जपायची असते’

राजकारणात आपली प्रतिमा आपणच जपायची असते. आता मात्र लोकांच्या मनातून राजकारणी उतरत चालले आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. दरम्यान, आमची आणि खरी शिवसेना जी शिंदेंची आहे त्यांची युती पुणे महापालिकेत नक्की होईल, असे बापट म्हणाले.