हगवणे कुटुंबाच्या वकिलाचं वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट, कोर्टात खळबळजनक दावा

सुनावणीवेळी हगवणे कुटुंबाच्या वकिलाने कोर्टात खळबळजनक दावा केला आहे. त्याने थेट वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेतला आहे.

हगवणे कुटुंबाच्या वकिलाचं वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट, कोर्टात खळबळजनक दावा
| Updated on: May 28, 2025 | 5:17 PM

पुण्यातील विवाहीत तरुणी वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन आपलं आयुष्य संपलं होतं. वैष्णवीने 16 मे रोजी आत्महत्या केली. सासरच्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी वैष्णवीचा पती, दीर, सासू, सासरा आणि नंदण यांना अटक केली आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी  पती शशांक हगवणे, दीर सुशील हगवणे, सासरा राजेंद्र हगवणे सासू लता हगवणे आणि नणंद करिष्मा हगवणे यांची पोलीस कोठडी संपल्यानं त्यांना आज कोर्टात हजर करण्यात आलं होतं.

वैष्णवी हगवणे प्रकरणात हगवणे कुटुंबाच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ झाली आहे,  शशांक हगवणे आणि करिष्मा हगवणे तसेच लता हगवणे यांच्या पोलीस कोठडीत 1 दिवसांची वाढ करण्यात आली आहे, तर  वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांच्या पोलीस कोठडीमध्ये 31 मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे.

दरम्यान सुनावणीवेळी हगवणे कुटुंबाच्या वकिलाने कोर्टात खळबळजनक दावा केला आहे. त्याने थेट वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेतला आहे. वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते, असा दावा हगवणे कुटुंबाच्या वकिलानं कोर्टात केला आहे. समोरुन नकार दिला असेल म्हणून आत्महत्या केली असं वकिलानं म्हटलं आहे. तसेच प्लॅस्टिकच्या छडीनं मारहाण झाली, त्याला हत्यार म्हणायचं का? असा प्रश्नही हगवणे कुटुंबाच्या वकिलानं उपस्थित केला.

दरम्यान दुसरीकडे वैष्णवीची आत्महत्या नसून तिची कट रचून हत्याच करण्यात आल्याचा आरोप वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी केला आहे. या प्रकरणातील एक आरोपी अद्यापही फरार आहे. निलेश चव्हाण हा अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये, सुरुवातीला त्याच्या शोध घेण्यासाठी तीन पथकांची नियुक्ती करण्यात आली होती, मात्र आता पथकांची संख्या वाढवण्यात आली असून, सहा पथकं निलेश चव्हाणचा शोध घेत आहेत. निलेश चव्हाणला अटक झाल्यास या प्रकरणात आणखी काही महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. वैष्णवीचं बाळ आणण्यासाठी गेलेल्या कस्पटे कुटुंबातील व्यक्तीला बंदूक दाखवून धमकावल्याचा आरोप निलेश चव्हाण याच्यावर आहे.