पिक्चर अभी बाकी है! कसब्यात काँग्रेसमध्ये बंडखोरी, नाना पटोले काय निर्णय घेणार?

| Updated on: Feb 04, 2023 | 11:54 PM

कसबा पेठ पोटनिवडणुकीत (Kasba Peth by election) काँग्रेसमध्ये (Congress) बंडखोरी होणार असल्याची माहिती समोर आलीय. काँग्रेसचे इच्छुक उमेदवार बाळासाहेब दाभेकर (Balasaheb Dabhekar) नाराज आहेत.

पिक्चर अभी बाकी है! कसब्यात काँग्रेसमध्ये बंडखोरी, नाना पटोले काय निर्णय घेणार?
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
Image Credit source: social media
Follow us on

पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुकीत (Kasba Peth by election) काँग्रेसमध्ये (Congress) बंडखोरी होणार असल्याची माहिती समोर आलीय. काँग्रेसचे इच्छुक उमेदवार बाळासाहेब दाभेकर (Balasaheb Dabhekar) यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने ते नाराज झाले आहेत. आपण पक्षात गेल्या 40 वर्षांपासून कार्यरत आहोत. पण तरीही पक्षाने आपला विचार केला नाही, या भावनेने बाळासाहेब दाभेकर नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी थेट पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाविरोधात जावून कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचा फटका काँग्रेसला पोटनिवडणुकीत बसण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस त्यांची मनधरणी करण्यात यशस्वी होते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

बाळासाहेब दाभेकर यांची नेमकी भूमिका काय?

“मी 1976 सालापासून काँग्रेसचा सभासद आहे. मला काँग्रेसने गेल्या 40 वर्षात काही दिलं नाही. मी पोटनिवडणुकीत काँग्रेसकडे उमेदवारी मागितली”, असं बाळासाहेब दाभेकर म्हणाले.

“पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता असून मला उमेदवारी देण्यात यावी, असं मी त्यांना सांगितलं”, अशी माहिती बाळासाहेब दाभेकर यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

“काँग्रेसने ज्या उमेदवाराला निश्चित केलंय त्यांनी अपक्ष निवडणूक लढवलीय, काँग्रेसच्या विरोधात निवडणूक लढवलीय. अशा माणसाला तुम्ही तिकीट देत असाल आणि काँग्रेसवर अन्याय करत असाल तर मी बंडखोर म्हणून उभा राहणार”, अशी भूमिका त्यांनी मांडली.

आधी जागा मिळवण्यासाठी मविआत चुरस, आता उमेदवारीवरुन नाराजी नाट्य

कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीत आपला उमेदवार उभा राहावा यासाठी महाविकास आघाडीतील तीनही मोठ्या घटक पक्षांनी दावा केला होता. शिवसेना पिंपरी चिंचवड जागेसाठी प्रचंड आग्रही होती. पण राष्ट्रवादीलादेखील तीच जागा हवी होती.

काँग्रेस कसबा पेठच्या जागेसाठी आग्रही होती. राष्ट्रवादी काँग्रेसला पिंपरी चिंचवडची जागा हवीच होती. जागा वाटपावरुन तीनही पक्षांमध्ये चर्चा झाली. अखरे चर्चेअंती शिवसेनेने माघार घेत राष्ट्रवादीसाठी पिंपरी चिंचवडची जागा सोडली.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची काल बैठक झाली होती. या बैठकीनंतर आज महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार निश्चित झाले.

काँग्रेसकडून कसब्यातून रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी निश्चित झालीय. तर चिंचवडमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राहुल कलाटे यांचं नाव निश्चित असल्याची माहिती समोर आलीय.