Ketan Murder Case: सिया आणि चेतनची नार्को टेस्ट होणार? कोर्टाचा काय फैसला? पोलिसांसमोर मोठे आव्हान?

Ketan Agarwal Siya Goyal Lohgad Murder Case: केतन अग्रवाल खूनप्रकरणात मुख्य संशयित सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. पोलिसांचा प्रकरणात सखोल तपास सुरू आहे. या दोघांची नार्को टेस्ट होणार का? काय आहे परिस्थिती?

Ketan Murder Case: सिया आणि चेतनची नार्को टेस्ट होणार? कोर्टाचा काय फैसला? पोलिसांसमोर मोठे आव्हान?
केतन अग्रवाल, सिया गोयल चेतन चौधरी
Image Credit source: एजन्सी
| Updated on: Jul 05, 2026 | 9:16 AM

Ketan Agarwal Siya Goyal Lohgad Murder Case: बांधकाम व्यावसायिक आणि तरुण उद्योजक केतन अग्रवाल याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी हत्या केली. 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावरून खोल दरीत ढकलत त्याची हत्या करण्यात आली. प्रकरणात काल वडगाव मावळ सत्र न्यायालयात सुनावणी झाली. पोलिसांनी वाढीव तीन दिवसांची पोलीस कोठडी मागितली. कोर्टाने ही मागणी फेटाळली. दोन्ही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. आता या दोघांची नार्को टेस्ट होणार का? यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.

सरकारी पक्षाचा युक्तीवाद

सरकारी पक्षाने युक्तीवाद करताना सियाचा दुसरा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. या फोनमधून डिलिट डेटा रिकव्हर करण्यात आला आहे. सिया आणि चेतन यांची समोरासमोर चौकशी करायची आहे. डेटात दोघांनी सांकेतिक भाषेचा वापर केला आहे. ते संभाषण उलगडायचे आहे. डिकोड करायचे आहे. त्यासाठी दोघांना वाढीव पोलीस कोठडी देण्यात यावी अशी विनंती काल करण्यात आली.

आरोपींच्या वतीने काय मांडण्यात आली बाजू?

तर आरोपींच्या वतीने वकील विपुल दुशिंग यांनी बाजू मांडली. सियाने प्रकरणात पोलिसांना पूर्ण सहकार्य केले आहे. ती पुढे पण सहकार्य करेल. तर पोलीस ज्या मोबाईलचा उल्लेख करत आहे, तो अगोदरच जप्त करण्यात आलेला आहे. मोबाईलमधील मॅसेज, कोड, सांकेतिक भाषा समजण्यासाठी आरोपींच्या पोलीस कोठडीची काहीएक आवश्यकता नाही, असे म्हणणे सादर केले.

नार्को टेस्ट सहमतीशिवाय नाही

या सुनावणीदरम्यान सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या नार्को टेस्टविषयी बाजू मांडण्यात आली. जोपर्यंत आरोपी नार्को टेस्टसाठी सहमती देत नाहीत, तोपर्यंत नार्को टेस्ट होऊ शकत नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले. तर सरकारी वकिलांनी सध्या नार्को टेस्टची गरज नसल्याचे सांगितले. दोन्ही पक्षांची सविस्तर बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडीची मागणी फेटाळली. सिया आणि चेतनची 14 दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली.

न्यायवैद्यक शास्त्र अहवालाची प्रतिक्षा

सियाचे तिच्या मैत्रिणीसोबतचे चॅटिंग व्हायरल झाले आहेत. तिने मैत्रिणीकडे न होणाऱ्या लग्नाचा संदेश पाठवत तिकीट बुक करण्यासाठी आधार कार्ड मागितले होते. या चॅटिंग, मोबाईल डेटा याविषयीचा न्यायवैद्यक शास्त्र अहवाल, फॉरेन्सिक अहवाल प्राप्त झाल्यानंतरच डेटा आणि चॅटिंगची कायदेशीर वैधता निश्चित होऊ शकेल, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

Follow Us