‘माझी मुलगी दोषी असेल तर फाशी द्या, पण आम्हाला का…’, केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणात सियाचे वडील भावूक, म्हणाले तरी काय?

Ketan Agarwal Murder Case: केतन अग्रवाल हत्याकांडातील आरोपी सिया गोयल हिच्या वडिलांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या दुकानावर FDA ने छापा टाकला आणि 4,172 किलो खाद्यपदार्थ जप्त केले. त्यानंतर तिच्या वडिलांची मोठी प्रतिक्रिया समोर आली आहे.

माझी मुलगी दोषी असेल तर फाशी द्या, पण आम्हाला का..., केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणात सियाचे वडील भावूक, म्हणाले तरी काय?
केतन अग्रवाल, सिया गोयल, प्रवीण गोयल
| Updated on: Jul 18, 2026 | 3:17 PM

Pune News: पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांडाला एक महिना पूर्ण झाला. मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना पुन्हा 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान सिया गोयलचे वडील प्रवीण गोयल यांची भावूक प्रतिक्रिया दिली आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) त्यांच्या दुकानावर अचानक छापा मारला आणि अन्नपदार्थ जप्त केले. या कारवाईनंतर तिचे वडील भावनिक झाले. माझी मुलगी दोषी असेल तर तिला फाशी द्या, पण आमच्या निष्पाप कुटुंबाला असे मानसिकदृष्ट्या त्रास देऊ नका असे आवाहन त्यांनी केले आहे.

तुकाराम मुंडे यांच्या पथकाची कारवाई

आयएएस (IAS) अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वात अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या पुणे झोन-1 ने ही कारवाई केली. अधिकार्‍यांनी 14 जुलै रोजी पुणे येथील मार्केट यार्डमधील बीजी गोयल अँड कंपनीवर छापा मारला होता. हे दुकान सियाचे वडील प्रवीण गोयल यांचे आहे. या छापेमारीत पथकाने 4,172 किलो खाद्यपदार्थ जप्त केले. त्याची एकूण किंमत जवळपास 8.14 लाख रुपये इतकी आहे. विभागाला या दुकानातील हळद पावडर, तीळ आणि सोया मिनी चंक्ससह चार खाद्य पदार्थ तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहे.

FDA नुसार, विना परवाना गोदामात माल ठेवणे, लेबलिंग नियमांचे उल्लंघन, खाद्य पदार्थांचा दर्जा, गुणवत्ता याविषयीची शंका यामुळे ही कारवाई करण्यात आली. केतन अग्रवाल खून प्रकरणाशी या कारवाईचा कोणताही संबंध नसल्याचे आणि एक नियमित प्रक्रियेतंर्गत कारवाई केल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.

संपूर्ण कुटुंब मोठ्या चिंतेत

आरोपी सियाचे वडील प्रवीण गोयलने माध्यमांसमोर येत त्यांची बाजू मांडली. काल केतनच्या वडिलांनी त्यांचे दुख मांडले होते. आपल्या मुलाला न्याय देण्याची विनंती करताना त्यांना अश्रू अनावर झाले. लग्न करायचे नव्हते तर सियाने अगोदरच सांगायचे होते, आपल्या मुलाचा जीव का घेतला असा सवाल त्यांनी केला. तर दुसरीकडे सियाचे वडील यांनी अशा कारवायांमुळे त्यांचे कुटुंब चिंतेत असल्याचे म्हटले आहे. मी कायदा आणि न्यायालयाचा पूर्ण सन्मान करतो. माझी मुलगी खरंच दोषी असेल तर तिला फाशीवर लटकवा. पण त्याची शिक्षा माझा मुलगा साहिल, पत्नी आणि मला का देण्यात येत आहे, असा सवाल त्यांनी केला. FDA च्या कारवाईवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Follow Us