सर्वात मोठी बातमी ! राधाकृष्ण विखेंना हटवा… जरांगेंच्या आंदोलनाआधीच मुख्यमंत्र्यांना पत्र; मोठ्या घडामोडींना वेग
मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनापूर्वी मराठा क्रांती मोर्चाने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. मराठा समाजाला मिळालेले SEBC आरक्षण टिकवावे, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. आरक्षणावर निर्णय न झाल्यास राधाकृष्ण विखे पाटलांना समितीमधून हटवावे, असेही पत्रात म्हटले आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या लाभार्थ्यांचे थकीत व्याज तातडीने जमा करण्याची मागणी करत, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवली सराटीत निर्णायक आंदोलन सुरू होत आहे. त्यापूर्वीच मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. जरांगे यांनी उपोषण करू नये म्हणून सरकारने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, मनोज जरांगे हे निर्णायक आंदोलनावर ठाम आहेत. त्यातच आता मराठा क्रांती मोर्चाने उडी घेतली आहे. मराठा क्रांती मोर्चाने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. मराठा समाजाला ‘मराठा’ म्हणून मिळालेले SEBC आरक्षण टिकवा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रातून केली आहे. मराठा आरक्षण प्रश्नावर अपेक्षित कार्यवाही करता आली नाही तर राधाकृष्ण विखे पाटील यांना समितीतून हटवण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे. तसेच मनोज जरांगे पाटीलांच्या आंदोलनाचा देखील पत्रात उल्लेख करण्यात आला आहे.
पुणे येथील सारथी कार्यालयात मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा आरक्षण अभ्यासकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. बैठकीत SEBC आरक्षण टिकविण्यासाठी शासनाने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर अपेक्षित कार्यवाही न झाल्याने मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी जबाबदारीतून बाजूला व्हावे, अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली. तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांचे प्रलंबित व्याज तात्काळ जमा करून त्यांचे CIBIL खराब होण्यापासून वाचवावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
शासनाने माहिती द्यावी
मराठवाडयामधील मराठा कुणबी, कुणबी-मराठा कुणबी नोंदींच्या आधारे जे मराठा बांधव कुणबी प्रमाणपत्र काढतील त्यांचा समावेश OBC प्रवर्गात होतो. यासाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत, ज्यांची नोंद फक्त मराठा आहे, असा फार मोठा वर्ग कोकण, मुंबई पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या अनेक भागांत आहेत. त्यांच्यासाठी सध्या SEBC आरक्षण सुरु असून ते मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे हे आरक्षण टिकविण्याच्या दृष्टीने शासन पातळीवर याची काय काय तयारी आहे याची संक्षिप्त माहिती शासनाने जाहिर केली पाहिजे. अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे.
या बैठकीला मराठा क्रांती मोर्चाचे राजेंद्र कोंढरे, विजय घोगरे, राजेंद्र कुंजीर, अनिल ताडगे, धनंजय जाधव, रघुनाथ चित्रे पाटील, सचिन आडेकर, व्यंकटेश बोडखे, अमर पवार, राकेश गायकवाड, किशोर मोरे, प्रशांत कुंजीर, मारुती भापकर, अभिमन्यू पवार, दशहरी चव्हाण, प्रकाश जाधव, टिळक भोस आणि इतर उपस्थित होते.