
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या दोघांना प्रत्येकी 5 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. तर वीरेंद्रसिंह तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर या तीन जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या तिन्ही जणांची पुराव्याच्या अभावी मुक्तता करण्यात आली आहे. पुण्याच्या विशेष न्यायालयाचे विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी हा निकाल दिला आहे.
विशेष न्यायालयाने निर्णय देताना काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत. वीरेंद्रसिंह तावडे यांचा या गुन्ह्यात हेतू दिसून आला आहे. संशय घेण्यासारखी परिस्थितीही आहे. पण त्यांच्या विरोधात गुन्हा सिद्ध करण्यास पोलीस आणि सरकार अपयशी ठरलं असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. भावे आणि पुनाळेकर यांच्या विरोधातही सक्षम पुरावे देण्यात पोलिसांना यश आली नसल्याचंही सांगत कोर्टाने या तिघांची निर्दोष मुक्तता केली आहे.
यावेळी कोर्टाने पोलिसांच्या तपास कार्यावरच फटकारे लगावले. आरोपींवर संशय घेण्यास पुरेसा वाव होता. तरीही तपास अधिकाऱ्यांनी योग्य तपास केला नाही. निष्काळजीपणा दाखवला. त्यामुळेच सबळ पुरावे नसल्याने तीन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यता येत आहे. या आरोपींवर यूएपीएचे कलमही सिद्ध होऊ शकले नसल्याचं कोर्टाने म्हटलंय.
आज या खटल्याची सुनावणी सुरू असताना बचाव पक्षाच्या एका वकिलाने जोरदार युक्तिवाद केला. आरोपी निर्दोष असल्याचं सांगण्याचा त्यांनी भरपूर प्रयत्न केला. हे सांगताना आरोपींच्या वकिलांनी तर दाभोलकर यांच्या हत्येचं समर्थनही केलं. त्यावर कोर्टाने जोरदार आक्षेप घेत महत्त्वाची टिप्पणी केली आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्याचे समर्थन करणं योग्य नाही. ही बाब गंभीर आहे. वकिलांनी भविष्यात ही चूक सुधारावी, असं कोर्टाने म्हटलं.
कुणाचाही खून होणे दुर्देवी आहे. साक्षीदारांची तपासणी करताना आरोपीच्या वकिलाने खुनाचं समर्थन केलं हे सुद्धा दुर्देवी आणि गंभीर आहे, असंही कोर्टाने म्हटलं आहे.
तावडे हे या घटनेतील मास्टरमाइंडपैकी एक होते असं दाभोलकर यांची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी म्हटलं होतं. सनातन संस्थेकडून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्याला वारंवार विरोध केला जायचा. तावडे याच संस्थेशी जोडले गेलेले होते, असा दावाही करण्यात आला होता. दरम्यान, हे प्रकरण सीबीआयकडेही गेलं होतं.
20 ऑगस्ट 2013 मध्ये पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या मागे असलेल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावरून दाभोलकर मॉर्निंग वॉकला निघाले होते. यावेळी दबा धरून बसलेले दोघे दुचाकीवरून आले आणि त्यांनी दाभोलकर यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात दाभोलकर यांचा जागीच मृत्यू झाला. गोळीबार केल्यानंतर आरोपी पळून गेले होते. दाभोलकर यांची हत्या झाल्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यासाठी महाराष्ट्रात प्रचंड आंदोलने झाली होती.