sharad pawar ajit pawar meet | सर्वात मोठी बातमी, शरद पवार आणि अजित पवार यांची पुण्यात गुप्त बैठक?

| Updated on: Aug 12, 2023 | 6:52 PM

महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडामोडी घडतील याचा काहीच भरोसा नाही. अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होवून एक महिना झालाय. त्यानंतर आज शरद पवार आणि अजित पवार यांची गुप्त भेट झाल्याची माहिती समोर येत आहे.

sharad pawar ajit pawar meet | सर्वात मोठी बातमी, शरद पवार आणि अजित पवार यांची पुण्यात गुप्त बैठक?
Follow us on

पुणे | 12 ऑगस्ट 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दोघांमध्ये बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. पुण्यातल्या कोरेगाव पार्क येथे दोघांची बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. एका व्यावसायिकाच्या घरी ही बैठक पार पडल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्यावसायिक अतुल चोरडिया यांच्या घरी ही बैठक पार पडली. चोरडिया यांच्या घरातून आधी शरद पवार बाहेर पडले. तर अजित पवार यांचा गाड्यांचा ताफा आतमध्येच होता. शरद पवार बाहेर पडल्यानंतर काही वेळाने अजित पवार यांचा ताफा बाहेर पडणार असल्याची माहिती समोर येत आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये भेट होवून अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गट आणि शरद पवार गट पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चांनंतर आज प्रत्यक्षपणे शरद पवार आणि अजित पवार यांच्यात बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे. ही भेट नेमकी का घडून आली? या भेटीचं नेमकं कारण काय, काय चर्चा झाली? याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाहीय.

अजित पवार खासगी गाडीने आले

पुण्यातल्या कोरेगाव पार्कमध्ये लेन नंबर 3 आहे. या परिसरात 73 नंबरच्या बंगल्यात दोन्ही नेत्यांची भेट झाल्याची माहिती मिळत आहे. शरद पवार निघून गेले आहेत. पण अजित पवार यांची गाडी बंगल्याच्या गेटच्या आतमध्ये आहे. गाडीसोबत वाहनचालकही आतमध्ये आहे. अजित पवार आज पुण्यातील चांदणी चौकच्या उड्डाणपुलाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्यात होते. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते थेट सर्किट हाऊस येथे पोहोचले. त्यांचा ताफा सर्किट हाऊस याच ठिकाणी ठेवलेला आहे. पण ते एका खासगी गाडीने कोरेगाव पार्क परिसरात पोहोचले.

काही दिवसांपूर्वी अजित पवार हे स्वत: शरद पवार यांच्या भेटीला गेले होते. अजित पवार यांच्या काकू प्रतिभा पवार यांची प्रकृती बिघडल्यानंतर दोन्ही नेत्यांची भेट झाली होती. त्यानंतर अजित पवार यांनी दोनवेळा शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यांच्यासोबत काही नेत्यांनीदेखील शरद पवारांची भेट घेतली होती. शरद पवार यांनी आपल्यासोबत सत्तेत यावं, अशी विनंती अजित पवार यांनी आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी केली होती. त्यानंतर आज पुण्यात दोन्ही नेत्यांची भेट झाल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे कोरेगाव पार्कमध्ये राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते देखील दाखल झाले आहेत.