‘एकच वादा, अजित दादा’, बारामतीनंतर आता पुणे, मोठ्या हालचाली, काय घडणार?

| Updated on: Sep 07, 2023 | 2:52 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राज्यभरात दौरा करत आहेत. अनेक ठिकाणी त्यांच्या सभा होत आहेत. त्यानंतर आता अजित पवार हे देखील सतर्क झाले आहेत. त्यामुळे अजित पवार गटातही वेगवेगळी रणनीती आखली जात आहे.

एकच वादा, अजित दादा, बारामतीनंतर आता पुणे, मोठ्या हालचाली, काय घडणार?
Follow us on

पुणे | 7 सप्टेंबर 2023 : महाराष्ट्रात आगामी काळात काय घडामोडी घडतात ते पाहणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. केंद्र सरकारने अचानक संसदेचं पाच दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. या अधिवेशनात ‘एक देश, एक निवडणूक’ हे विधेयक सादर केलं जाण्याची शक्यता आहे. तसेच या विधेयकाचं कायद्यात रुपांतर झालं तर देशात सर्वच निवडणुका येत्या डिसेंबर महिन्यात होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अर्थात या निवडणुका कधीही जाहीर झाल्या तरी आता विरोधी पक्षही कामाला लागले आहेत. विरोधी पक्षांच्या सातत्याने बैठका पार पडत आहेत.

राज्यात आणि देशात विविध राजकीय घडामोडी घडत असताना महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांसह सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्ष विरोधी पक्षात आहे. त्यामुळे सध्या राष्ट्रवादीचे दोन्हीन गटांमध्ये संघर्ष बघायला मिळतोय.

अजित पवार यांचं बारामतीत शक्तिप्रदर्शन

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांकडून आपणच वरचढ आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. शरद पवार यांच्या राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सभा पार पडत आहेत. त्यानंतर अजित पवार यांच्या गटाकडून सभांचा धडाका सुरु झालाय. विशेष म्हणजे अजित पवार यांनी नुकतंच बारामतीत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं.

मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर बारामतीच्या कार्यकर्ते आणि नागरिकांनी अजित पवार यांचा शहरात स्वागत केलं. यावेळी त्यांना नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. यावेळी जेसीबीच्या साहाय्याने अजित पवार यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला होता. अजित पवार यांची बारामतीत भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. आपलं स्वागत आणि मिरवणूक पाहून अजित पवार भारावले होते.

अजित पवार यांचं पुण्यात शक्तिप्रदर्शन

विशेष अजित पवार बारामतीनंतर आता पुण्यात शक्तिप्रदर्शन करणार आहेत. अजित पवार यांचा पुण्यात होणार रोड शो होणार आहे. शरद पवारांच्या वाढत्या दौऱ्यानंतर आता अजित पवार यांचं पुण्यावर लक्ष लागलं आहे. त्यामुळे अजित पवार यांचा 10 सप्टेंबरला पुण्यात रोड शो होणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवारांच्या ‘जिजाई’ या निवासस्थानापासून ‘रोड शो’ला सुरुवात होणार आहे. जिजाई ते शिवापूर असा रोड शो होणार आहे. अजित पवार 10 सप्टेंबरला पुण्याहून कोल्हापूरला जाणार असल्याने त्याच मार्गावर रोड शो होणार आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर प्रथमच अजित पवार पुण्यात शक्तिप्रदर्शन करणार आहेत.