पुणे शहरातून नवीन विमानसेवा, या विमानात प्रथमच मिळणार बिझनेस क्लास सुविधा

Pune News : पुणे शहरातून आणखी एक विमानसेवा सेवा सुरु होत आहे. या विमानसेवेमुळे दोन IT शहरांमध्ये जाणे येणे अधिक सुलभ होणार आहे. दोन्ही शहरांमध्ये माहिती अन् तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

पुणे शहरातून नवीन विमानसेवा, या विमानात प्रथमच मिळणार बिझनेस क्लास सुविधा
Pune and Hyderabad air service
| Updated on: Jul 21, 2023 | 12:19 PM

पुणे | 21 जुलै 2023 : पुणे विमानतळावरुन अनेक प्रकारच्या सुविधा सुरु झाल्या आहेत. पुणे विमानतळावरील रन वे लायटिंगचे काम केले गेले आहे. यामुळे पुणे विमानतळावरुन २४ तास विमान वाहतूक करणे शक्य झाले आहे. या सुविधेमुळे विविध शहरातील विमानांच्या फेऱ्या वाढवल्या जात आहेत. आता पुणे शहरातून अनेक नवीन शहरात विमानसेवा सुरु झाल्या आहेत. येत्या २६ जुलैपासून ही सुविधा सुरु होणार आहे. यासाठी प्रथमच बिझनेस क्लासचे तिकीट मिळणार आहे.

कोणत्या शहरासाठी सुरु झाली सुविधा

पुणे हे माहिती आणि तंत्रज्ञानाचे शहर आहे. तसेच बंगळुरु आणि हैदराबाद हे देखील माहिती अन् तंत्रज्ञानाची शहरे आहेत. ही शहरे पुण्यावरुन हवाई मार्गाने जोडली जाणार आहेत. स्टार एअर या कंपनीकडून ही विमानसेवा सुरु करण्यात येणार आहे. येत्या २६ जुलैपासून ही सुविधा सुरु होणार आहे. स्टार एअर ही कंपनी बंगळुरु, हैदराबाद आणि पुणे असे विमान सुरु करणार आहे. शनिवार, रविवार वगळता ही सेवा नियमित असणार आहे.

प्रथमच बिझनेस क्लास सुविधा

पुण्यावरुन प्रथमच बिझनेस क्लास सुविधा स्टार एअर कंपनी देणार आहे. त्यासाठी कंपनी त्याचे लक्झरीयस एम्ब्रेर E175 हे विमान वापरणार आहे. पुणे शहरातून संध्याकाळी 6:45 वाजता हे विमान निघणार असून हैदराबादला 8:10 वाजता पोहचणार आहे. तसेच हैदराबादवरुन 5:05 वाजता विमान निघणार असून 6:15 वाजता पुणे शहरात पोहचणार आहे.

भविष्यात आणखी सेवा

स्टार एअरचे सीईओ सिमरन सिंग तैवान यांनी म्हटले की, बंगळुरु, हैदराबात आणि पुणे ही सेवा प्रथमच आम्ही सुरु करत आहोत. यामुळे प्रवाशांची अनेक दिवसांची मागणी पूर्ण होणार आहे. पुणे हे आमच्यासाठी चांगले नेटवर्क आहे. त्याठिकाणी भविष्यात आणखी सेवा आम्ही सुरु करणार आहोत.

या सुविधा मागील महिन्यात

नवी दिल्ली, नागपूर, जोधपूर, अहमदाबात, बेंगळूर या शहरांमध्ये पुणे येथून विमाने सुरु करण्यात आली. जून महिन्यापासून या सेवा सुरु झाल्या होत्या. त्यानंतर गो फस्टने नवी दिल्ली, बेंगळुरु, नागपूरसाठी सात विमानफेऱ्या सुरु केल्या होत्या. जुलै महिन्यात राजकोट, वडोदरा या शहरांतही विमानसेवा सुरु झाली होती.