वाहनांचे हॉर्न भारतीय वाद्यांचे, तर अ‍ॅम्ब्युलन्सवर आकाशवाणीची धून, प्रदूषणावर गडकरींचा भन्नाट पर्याय

| Updated on: Sep 24, 2021 | 12:01 PM

"सायरन अन सलामी हे मंत्र्यासाठी आकर्षणाचे विषय आहेत, मंत्रिपद गेल्यावर हे सोबत राहत नाही. देशात सर्वात जास्त आवाजाचं प्रदूषण पुणे शहरात आहे, दादा हे प्रदूषण थांबवा" असं आर्जवही नितीन गडकरी यांनी केलं.

वाहनांचे हॉर्न भारतीय वाद्यांचे, तर अ‍ॅम्ब्युलन्सवर आकाशवाणीची धून, प्रदूषणावर गडकरींचा भन्नाट पर्याय
Follow us on

पुणे : वाहनांना भारतीय वाद्यांचे हॉर्न बसवण्याची भन्नाट आयडिया मांडल्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी रुग्णवाहिकेसाठीही धून शोधली आहे. वाढत्या प्रदूषणावर उतारा म्हणून अ‍ॅम्ब्युलन्सवर आकाशवाणीची धून बसवण्याचा पर्याय गडकरींनी सुचवला. आज पुण्यातल्या सिंहगड रोडवरच्या एका उड्डाणपूलाच्या भूमिपूजनाप्रसंगी नितीन गडकरी बोलत होते. मंचावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पुण्याचे खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि पुण्यातील विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात नितीन गडकरी यांनी राज्य ते केंद्र आणि राष्ट्र ते आंतरराष्ट्रीय कामाची उदाहरणे देत नेहमी स्टाईलमध्ये जोरदार फटकेबाजी केली.

नितीन गडकरी काय म्हणाले?

“पुण्यात येताना दुःख होतं, पुण्यातील हवा शुद्ध होती, माझी बहीण पुण्याची, स्वारगेटजवळ ती राहत होती. आम्ही पर्वतीवर जाऊन खायचो. आताचे पुणे प्रदूषित झाले आहे. जल, वायू आणि ध्वनी प्रदूषण याबाबत इंटरनॅशनल बेंचमार्क आहेत, त्याचं पालन करु. मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे, मी सगळ्या मंत्र्यांचे हॉर्न बंद केले, लाल दिवे काढले, मला ध्वनी प्रदूषणाचा त्रास लक्षात आला. मी ऑर्डर काढणार आहे, जर्मन व्हायलिनवादक होता, त्याने आकाशवाणीची ट्यून तयार केली होती, मी ती ट्यून शोधली, आता अ‍ॅम्ब्युलन्सवर ती लावणार, कानाला चांगलं वाटतं” असं गडकरी म्हणाले.

“सायरन अन सलामी हे मंत्र्यासाठी आकर्षणाचे विषय आहेत, मंत्रिपद गेल्यावर हे सोबत राहत नाही. देशात सर्वात जास्त आवाजाचं प्रदूषण पुणे शहरात आहे, दादा हे प्रदूषण थांबवा” असं आर्जवही नितीन गडकरी यांनी केलं. “तीन चार महिन्यात ऑर्डर काढतोय, बीएमडब्ल्यू, मर्सिडीज पासून सगळ्यांना, इथून पुढे सगळ्या गाड्यांना फ्लेक्स इंजिनच असलं पाहिजे, पुण्याला प्रदूषणापासून मुक्ती देण्यासाठी इथेनॉलला परवानगी द्या, केंद्रातून सर्व मदत मी करतो” असं आश्वासनही गडकरींनी दिलं.

मेट्रोसाठीही नवी संकल्पना

नागपूर मेट्रोची निर्माण किंमत 350 कोटी रुपये प्रति किलोमीटर, पुणे मेट्रोची किंमत 380 कोटी रुपये प्रति किलोमीटर, पण एक नवीन मेट्रोची संकल्पना आहे, या मेट्रोची निर्माण किंमत फक्त एक कोटी रुपये प्रति किलोमीटर अशी राहील. मी कन्सलटन्ट म्हणून फुकट काम करायला तयार आहे. ही मेट्रो सध्याच्या ब्रॉडगेज रेल्वे ट्रॅकवर धावेल आणि यासाठी भारतीय रेलवेसोबत मीटिंगसुद्धा झाली आहे. नागपूर परिसरात सुरु करणार आहोत, तसेच पश्चिम महाराष्ट्रात सुरु करू शकतो. पुणे ते नाशिक, पुणे ते कोल्हापूर, पुणे ते अहमदनगर, पुणे ते सोलापूर अशी ही नवीन मेट्रो सुरु होऊ शकते. या मेट्रोमध्ये 6 अत्याधुनिक कोच असतील आणि दोन कोच विमानासारखे असतील, असं गडकरींनी सांगितलं.

हॉर्नचे सूर बदलणार

दरम्यान, नितीन गडकरी यांनी आपल्या मंत्रालयातील सचिवांना एक अध्यादेश काढण्याच्या सूचना काही दिवस आधी दिल्या आहेत. लवकरच काढण्यात येणाऱ्या अध्यादेशानुसार भारतीय वाद्यांचे सूर हॉर्न मध्ये वापरण्याची सूचना दिली आहे. भारतीय वाद्य ज्यात, तबला, पेटी, तानपुरा, बासरी चे सुमधुर सूर ऐकू हॉर्नमधून येणार आहेत. त्यामुळे प्रवास करताना आता तुम्हाला गर्दीत कर्णकर्कश आवाज ऐकू न येता सुमधुर संगीत पुढच्या काळात ऐकायला मिळेल.

वायू प्रदूषणाचा वाढता स्तर

देशात वायू प्रदूषणाचा स्तर वाढत आहे त्यातही अनेक जण मोठ्या आवाजाचे हॉर्न गाडीला लावतात. विनाकारण जोरजोराने हॉर्न वाजवून वाहन चालकांचं लक्ष विचलित करतात. निष्काळजीपणाने हॉर्न वाजविल्याने अपघात होण्याची शक्यता देखील वाढते. पर्यायानं ध्वनी प्रदूषण देखील वाढत यावर आता केंद्रीय वाहतूक मंत्रालय तोडगा काढणार आहे.

संबंधित बातम्या:

हॉर्नचा सूर बदलणार, भारतीय संगीत वापरलं जाणार; नितीन गडकरी यांची माहिती

अजितदादा, मुख्यमंत्र्यांसोबत प्रस्ताव बनवा, नरीमन पॉईंट ते दिल्ली 12 तासात जोडतो, गडकरींचा शब्द