
Bandu Andekar Arrest: पुण्यात शुक्रवारी 5 सप्टेंबर रोजी, गणपती विसर्जनाच्या पूर्वसंध्येला आंदेकर टोळीने राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरांच्या हत्येचा बदला घेतला. त्यांनी वनराज यांचा खून करणारा आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकरची गोळ्या झाडून हत्या केली. आयुष कोमकर क्लास सुटल्यानंतर पार्किंगमध्ये येताच आंदेकर टोळीच्या अमन पठाण आणि यश पाटील यांनी त्याची गोळ्या घालून हत्या केली. या प्रकरणानंतर पुणे हादरले होते. आता पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
बंडू आंदेकरच्या मुलीला अटक
पोलिसांनी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरला अटक केली आहे. त्यासोबतच त्याच्या सहा सहकाऱ्यांना देखील बेड्या घालण्यात आल्या आहेत. आरोपी पळून जात असताना पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या या कारवाईत बंडू आंदेकरची मुलगी आणि दोन नातू देखील असल्याचे समोर आले आहे. तसेच पोलिसांनी आयुषच्या हत्येचा रिल्स तयार करणाऱ्यांबाबतही मोठा निर्णय निर्णय घेतला आहे.
13 पैकी 8 आरोपींना अटक
आयुष कोमकर हत्या प्रकरणाबाबत अपर पोलिस आयुक्त पंकज देशमुख यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले, आयुष कोमकर खून प्रकरणात 13 पैकी 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात यश पाटील, अमन पठाण, अमित पाठोळे, सुजल मेरगुळ यांचा सक्रिय सहभाग होता. यश पाटील, अमन पठाण यांनी आयुषवर गोळ्या झाडल्या होत्या. अमित पाठोळे, सुजल मेरगुळ या दोघांनी या हत्येसाठी शस्त्र पुरवली होती तसेच रेकी करणे, टेहळणी करणे हा यांचा महत्त्वाचा भाग होता.
पुढे ते म्हणाले, या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, वृंदावनी निलंजय वाडेकर यांना अटक करण्यात आली आहे. सोमनाथ गायकवाड यांचे कुटुंबीय हे मूळ टार्गेट होते. सोशल मीडियावर या गँग संदर्भात कोणी रिल्स अपलोड केलेल्या असतील त्यांच्यावर पण पोलिसांकडून कारवाई होणार. अजून 5 आरोपी फरार आहेत त्यांचा आम्ही शोध घेत आहोत. या गँग विरोधात कोणाला काही तक्रार करायची असेल तर त्यांनी पोलिसात तक्रार करावी.