अखेर बिंग फुटलं, कॅन्सरची बतावणी, दीड कोटी उकळणाऱ्या महिला डॉक्टरवर गुन्हा

| Updated on: Dec 21, 2020 | 7:17 PM

डॉ.गोद्रास हिने जाधव यांच्याकडून 2017 पासून आत्तापर्यंत एक कोटी 47 लाख रुपये इतकी रक्कम घेतली आहे. Police register case against woman doctor for cheated woman patient

अखेर बिंग फुटलं, कॅन्सरची बतावणी, दीड कोटी उकळणाऱ्या महिला डॉक्टरवर गुन्हा
Follow us on

पुणे: पुण्यातील एका महिलेला कॅन्सर झाल्याचे सांगत त्यावरील उपचारांसाठी महिला डॉक्‍टरने तब्बल 1 कोटी 47 लाख रुपये घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोट्यावधी रुपये घेऊनही महिलेकडे पैशांसाठी तगादा लावणाऱ्या डॉक्‍टरचा महिलेच्या पतीने खोटेपणा उघडकीस आणला. डॉक्‍टर महिलेविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. डॉ. विद्या धनंजय गोद्रास असे गुन्हा दाखल झालेल्या महिला डॉक्‍टरचे नाव आहे. याप्रकरणी सुषमा सुभाष जाधव यांनी फिर्याद दिली. (Police register case against woman doctor for cheated woman patient)

डॉ.गोद्रास हिने जाधव यांच्याकडून 2017 पासून आत्तापर्यंत एक कोटी 47 लाख रुपये इतकी रक्कम घेतली आहे. फिर्यादीची एका मैत्रीणीच्या माध्यमातून डॉ.गोद्रास हिच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर फिर्यादी 2017 पासून डॉ.गोद्रास हिच्याकडे अर्धशिसी व गुडघेदुखीवर उपचार घेत होत्या. त्यावेळी तिने फिर्यादीला “आपण कॅनडाच्या एका आयुर्वेदीक संस्थेची फ्रॅंचायझी घेतली आहे, शहरातील अनेक रुग्णांना त्याचा लाभ झाला आहे’ असे सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांना व्हॉटस्‌अपवर नाभीचे छायाचित्र पाठविण्यास सांगितले. ते छायाचित्र तिने कॅनडातील संस्थेकडे पाठविले. त्यानंतर संबंधीत संस्थेकडून आलेल्या अहवालामध्ये फिर्यादी यांना लिव्हर असायटीस झाल्याचे असल्याचे डॉ.गोद्रास हिने सांगितले.

मृत्यूची भीती दाखवून उपचारांना सुरुवात

फिर्यादी महिलेला संबंधित अहवाल हा गोपनीय असल्याने तो रुग्ण किंवा त्यांच्या कुटुंबीयांना दाखवत येत नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर डॉ. गोद्रास हिने फिर्यादीवर उपचार सुरू करण्याचे सुचविले. त्याचबरोबर लवकर उपचार सुरु न केल्यास मृत्यु ओढावू शकतो, अशी भीती दाखवली. या प्रकारामुळे घाबरुन फिर्यादी महिलेने डॉ.गोद्रासकडे तत्काळ पैसे भरून उपचार सुरू केले. त्यानंतरही संबंधीत डॉक्‍टर फिर्यादी यांना अहवाल किंवा औषधांची चिठ्ठी न देता त्यांना केवळ गोळ्या देत होती.

कॅन्सर झाल्याची बतावणी

दरम्यान, यावर्षी पुन्हा फिर्यादीच्या नाभीचे छायाचित्र संबंधीत संस्थेला पाठवून फिर्यादीस लिव्हरच्या वरच्या बाजुस कॅन्सरची गाठ असल्याचे सांगितले. त्यावरील उपचारांसाठी सात लाख रुपये आगाऊ मागितले. मात्र, फिर्यादीकडील पैसे संपले होते. त्यांनी त्यांच्या पतीकडे पैशांची मागणी केली. पतीने विचारल्यानंतर फिर्यादीने त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांबाबतची माहिती दिली. त्यानंतर फिर्यादीच्या पतीने आजाराची कागदपत्रे व अहवाल मागितले. त्यावेळी डॉ.गोद्रास हिने ते देण्यास नकार दिला. या प्रकारामुळे संशय वाटल्याने एका वकीलाला घेऊन डॉ.गोद्रास हिची भेट घेतली. त्यावेळीही तिने आजार बरा झाल्याशिवाय अहवाल देता येत नसल्याचे सांगितले. या सर्व प्रकारात फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल केलाय. या सर्व प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असून मोठं रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तवली जातेय. (Police register case against woman doctor for cheated woman patient)

फिर्यादी महिलेची 2017 पासून फसवणूक सुरु असल्याची माहिती वानवडी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांनी दिली. डॉ. गोद्रास हिने निसर्गोपचार पद्धतीनं उपचार करत असल्याचे फिर्यादीला सांगून तिच्याकडून पैसे उकळले असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या:

बेपत्ता महिलेचा तीन वर्षांनी शोध, शिर्डीतून महिला गायब का होतात?

बँक व्यवस्थापकच दरोडेखोर, वर्धा बँक दरोड्याची फिल्मी कहानी

(Police register case against woman doctor for cheated woman patient)