
पुण्यातील २०१२ च्या प्रसिद्ध जे.एम. रोड साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. अस्लम शब्बीर जहागीरदार उर्फ बंटी जहागीरदार असे या आरोपीचे नाव आहे. एका नातेवाईकाच्या अंत्यविधीहून घरी परतत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर बेछूट गोळीबार केला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या हत्येनंतर दोन्ही आरोपींनी स्वतःहून पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बंटी जहागीरदार हा बुधवारी दुपारी आपल्या एका नातेवाईकाला श्रद्धांजली वाहण्यासाठी स्मशानभूमीत गेला होता. तेथून तो स्कूटरवरुन घरी परतत असताना, जर्मन हॉस्पिटलच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी त्याला गाठले. हल्लेखोरांनी अत्यंत जवळून जहागीरदारवर तीन गोळ्या झाडल्या. यातील दोन गोळ्या त्याच्या छातीत आणि पोटात लागल्याने तो जागीच कोसळला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जहागीरदारला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
गोळीबाराची ही थरारक घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या हत्येनंतर श्रीरामपूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली होती. मात्र, अटकेच्या भीतीने दोन्ही संशयित आरोपींनी रात्री उशिरा शिर्डी पोलिसांसमोर स्वतःहून आत्मसमर्पण केले. या हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, जुन्या वैमनस्यातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
दरम्यान १ ऑगस्ट २०१२ रोजी पुण्याच्या जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनी संपूर्ण देश हादरला होता. या स्फोटातील संशयितांना शस्त्रे पुरवल्याच्या आरोपाखाली जानेवारी २०१३ मध्ये दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) बंटी जहागीरदारला अटक केली होती. तो २०२३ पासून जामिनावर बाहेर होता. त्याच्यावर १९९७ पासून आतापर्यंत तब्बल १७ गंभीर गुन्हे दाखल आहेत. बंटी जहागीरदारचे कुटुंब स्थानिक राजकारणातही सक्रिय आहे. त्याची आई श्रीरामपूर नगरपरिषदेची माजी सदस्य होती. तर त्याचे चुलत भाऊ रईस शेख जहागीरदार हे सध्या नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक परिक्षेत्राचे महानिरीक्षक दत्तात्रेय कराळे यांनी तातडीने श्रीरामपूर गाठून घटनास्थळाची पाहणी केली. श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक जयदत्त भवर यांनी सांगितले की, “आरोपींना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असून, चौकशीनंतर हत्येमागचा मुख्य सूत्रधार आणि कारण स्पष्ट होईल.” खबरदारीचा उपाय म्हणून जहागीरदारचा मृतदेह शवविच्छेदनासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात (GMCH) पाठवण्यात आला आहे.