छत्र्या मोफत दुरुस्त, पुण्यात काँग्रेसचा उपक्रम, पुणेकरांच्या रांगा

| Updated on: Jun 18, 2021 | 10:30 AM

मोडकी छत्री घेऊन घराबाहेर जाण्याचीही पंचाईत होते, मग अशा वेळी करायचं काय ? हा प्रश्न असतो, हीच अडचण लक्षात घेतं पुण्यात काँग्रेसने नादुरुस्त छत्र्या दुरुस्त करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

छत्र्या मोफत दुरुस्त, पुण्यात काँग्रेसचा उपक्रम, पुणेकरांच्या रांगा
पुणे काँग्रेसचा छत्री दुरुस्ती उपक्रम
Follow us on

पुणे : पुणे तिथे काय उणे! याचा प्रत्यय पुणेकर वारंवार देत असतात. पुण्याच्या या लौकिकाला साजेसा उपक्रम काँग्रेसने शहरात राबवला आहे. नादुरुस्त छत्र्या मोफत दुरुस्त करण्याची मोहीम काँग्रेसने हाती घेतली आहे. पुणे शहरात अनेक ठिकाणी याची पोस्टर्स लक्ष वेधून घेत आहेत. त्याहीपेक्षा सोशल मीडियावर व्हायरल झालेले हे फोटो नेटिझन्ससाठी चर्चेचा विषय ठरत आहेत. (Pune Congress Posters of Free Umbrella repairing ahead of Monsoon Rain)

पावसाळ्यात काँग्रेसचा अनोखा उपक्रम

पावसाळा सुरु झाला आहे. त्यामुळे छत्रीशिवाय गत्यंतर नाही. छत्र्या विसरणं हा तर पावसाळ्यातील राष्ट्रीय आजारच म्हणावा लागेल. अशावेळी पुन्हा मोर्चा वळवावा लागतो, तो जुन्या छत्र्यांकडे. जुन्या छत्र्यांचे कधी ‘काडी-मोड’ झाले असतात, तर कधी तारा वाकलेल्या असतात, कधी कापडाला ठिगळं पडलेली असतात. बरं, नवीन घेतलेली छत्रीही थोड्याशा वारा-पावसाने कधी कोलमडेल याचा नेम नाही. मात्र सारखी नवी छत्री घेणं परवडणारं नाही. मोडकी छत्री घेऊन घराबाहेर जाण्याचीही पंचाईत होते, मग अशा वेळी करायचं काय ? हा प्रश्न असतो, हीच अडचण लक्षात घेतं पुण्यात काँग्रेसने नादुरुस्त छत्र्या दुरुस्त करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

काँग्रेस भवनाबाहेर पुणेकरांच्या रांगा 

विशेष म्हणजे हा छत्री दुरुस्ती उपक्रम चकटफू आहे. हो.. तुमच्या छत्र्या मोफत दुरुस्त करुन दिल्या जाणार आहेत. आपल्या जवळची नादुरुस्त छत्री मोफत दुरुस्त करुन दिली जाईल, असं पोस्टरवर मोठ्या अक्षरात लिहिलं आहे. ही फुकटची संधी सोडणार तरी कोण. त्यामुळे पुणेकरही सकाळपासूनच काँग्रेस भवनच्या बाहेर छत्र्या दुरुस्त करण्यासाठी छत्र्या घेऊन हजर आहेत. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले आहे. काँग्रेसचा हा उपक्रम पुणेकरांच्या पसंतीस उतरल्याचं त्यांच्या खुललेल्या चेहऱ्यांवरुन दिसत आहे.

संबंधित बातम्या :

पुणेकर महिलेची डोकॅलिटी! चक्क नारळाच्या झाडाचं डोहाळे जेवण

पुणे तिथे काय उणे… पुण्यात आंबे खाण्याची स्पर्धा

(Pune Congress Posters of Free Umbrella repairing ahead of Monsoon Rain)