
पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली आहे. ही संतापजनक घटना पुण्यातील उरुळी कांचन तालुक्यातील सोरतापवाडी येथे घडली आहे. विवाहीत महिला ही इंजिनअर होती. मृत महिलेचे नाव दीप्ती मगर-चौधरी असे आहे. सतत सासरचे लोकांनकडून होणाऱ्या अपमानाला, मानसिक छळाला दीप्ती कंटाळली होती. शेवटी 25 जानेवारी रोजी तिने गळफास लावून आत्महत्या केली.
या प्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. मृत दीप्तीची सासू सरपंच असून सासरे शिक्षक असल्याची माहिती समोर आली आहे. दीप्तीच्या आई हेमलता मगर (वय ५०) यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. दिलेल्या तक्रारीत त्यांनी सविस्तर माहिती सांगितली आहे.
– दीप्तीचे लग्न रोहन कारभारी चौधरी यांच्याशी २३ नोव्हेंबर २०१९ रोजी वृंदावन गार्डन, थेऊर येथे रितीरिवाजाप्रमाणे झाले.
– लग्नानंतर सुरुवातीचे एक महिना सर्व काही व्यवस्थित चालले.
-त्यानंतर २५ डिसेंबर २०१९ पासून तिच्या पती रोहनने तिच्या चरित्रावर संशय घेऊन तिचा छळ सुरू केला.
-पती, सासू-सासरे आणि दीर यांनी तिला सतत अपमानास्पद बोलणे केले, जसे की “तू देखणी नाहीस”, “तुला स्वयंपाक, कपडे धुणे, घर साफ ठेवणे येत नाही”, “शेतात काम करणाऱ्या बायका तरी चांगल्या आहेत” अशी विधाने करून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाला.
-पतीने हाताने मारहाण, शिवीगाळ आणि दमदाटी सुरू केली.
-सुरुवातीला दीप्तीने आईला काही सांगितले नाही, पण नंतर तिने आईला त्रासाबाबत सांगितले.
-काही काळानंतर दीप्तीला दिवस गेले आणि ४ मे २०२३ रोजी तिची डिलिव्हरी झाली. मुलगी झाल्याने सासरच्या लोकांनी नाराजी व्यक्त केली.
-नंतर दीप्तीने आईला फोन करून सांगितले की, त्यांचा एक्सपोर्ट व्यवसाय बंद झाला आहे. त्यामुळे पती रोहनने माहेरून १० लाख रुपये नवीन व्यवसायासाठी आणण्याची मागणी केली. हे पैसे दीप्तीच्या कुटुंबाने रोख स्वरूपात दिले.
-पुढे काही दिवस व्यवस्थित चालले, पण नंतर रोहनने पुन्हा तक्रार सुरू केली की, लग्नात तिच्या वडिलांनी हुंडा म्हणून चारचाकी गाडी दिली नाही.
-संसार सुखाचा व्हावा म्हणून दीप्तीच्या कुटुंबाने पुन्हा २५ लाख रुपये रोख स्वरूपात चारचाकी गाडी घेण्यासाठी दिले.
-2025मध्ये पुन्हा दीप्तीला दिवस गेले होते. पहिली मुलगी असल्यामुळे तिच्या इच्छेविरुद्ध गर्भलिंग तपासणी केली. मुलगी असल्याचे कळतचा गर्भपात केला.
या सगळ्या मानसिक आणि शारीरिक छळामुळे दीप्तीने अखेर आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. या घटनेने परिसरात संताप व्यक्त होत असून, पोलिस तपास करत आहेत.