Pune Rain : पुणेकरांनो सावधान… जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळांवर संचारबंदी; आदेशाचं उल्लंघन केल्यास कारवाई होणार

हवामान विभागानं मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर पुणे जिल्ह्यातील सर्वच पर्यटन स्थळांवर प्रशासनाकडून कलम 144 अंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आलीय. 14 ते 17 जुलै दरम्यान पर्यटन स्थळाच्या 1 किलोमीटर परिसरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आलीय.

Pune Rain : पुणेकरांनो सावधान... जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळांवर संचारबंदी; आदेशाचं उल्लंघन केल्यास कारवाई होणार
| Updated on: Jul 13, 2022 | 8:10 PM

पुणे : जिल्ह्यात मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळतोय. पुणे जिल्ह्यात असलेल्या सर्वच धरणक्षेत्रात मोठा पाऊस झालाय. त्यामुळे धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. अशावेळी जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर तरुणाई आणि नागरिक मोठी गर्दी करत आहेत. दरम्यान, हवामान विभागानं (Meteorological Department) मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर पुणे जिल्ह्यातील सर्वच पर्यटन स्थळांवर प्रशासनाकडून कलम 144 अंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आलीय. 14 ते 17 जुलै दरम्यान पर्यटन स्थळाच्या (Tourist Places) 1 किलोमीटर परिसरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आलीय. तसंच आदेशाचं उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आलाय.

पुणे जिल्ह्यातल्या शाळा-कॉलेजना तीन दिवस सुट्टी जाहीर

पुणे जिल्ह्यातील काही तालुके वगळून 12 वीपर्यंतच्या शाळांना तीन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक 14 ते 16 जुलैपर्यंत सुट्टी जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये इंदापूर, पुरंदर, बारामती, दौंड, शिरूर या तालुक्यातील शाळांना सुट्टी नसणार आहे. जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यातच पुढच्या 48 तासांतही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यातही एक दिवस शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता जिल्ह्यातील काही तालुक्यांत तीन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. परिपत्रक काढून जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले आहेत.

सिंहगड किल्ला 3 दिवस बंद राहणार?

पुण्यात सुरू असलेल्या पावसाचा अंदाज आणि पायथ्यापासून सिंहगडाकडे जाणाऱ्या 9 किमीच्या मार्गाला दरड कोसळण्याच्या शक्यतेमुळे पुणे वनविभागाने जिल्हा प्रशासनाला पत्र लिहून सिंहगड किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांना 16 जुलैपर्यंत बंदी घालण्याची विनंती केली आहे. मागील महिन्यात दरड कोसळून एका ट्रेकरचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी, किल्ल्याला भेट देण्यास तात्पुरती बंदी आवश्यक आहे, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.