मोठी बातमी! पुण्यातील बड्या कंपनीने रातोरात गुंडाळला गाशा, 700 कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ

देशातील नामांकित आयटी पार्क पैकी एक असलेला हिंजवडी आयटी पार्क येथील फेज टू मधील थिंक टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या आयटी कंपनीने अवघ्या काही महिन्यात गाशा गुंडाळला आहे. या कंपनीमुळे जवळपास 700 कर्मचारी रस्त्यावर आले आहेत.

मोठी बातमी! पुण्यातील बड्या कंपनीने रातोरात गुंडाळला गाशा, 700 कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ
Company Close
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: May 31, 2026 | 9:03 AM

देशातील सर्वात नामांकित आणि मोठ्या आयटी पार्क्सपैकी एक असलेल्या पुण्याच्या हिंजवडी आयटी पार्कमधून एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील फेज-2 मध्ये असलेल्या ‘थिंक टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ या आयटी कंपनीने अचानक आपले कामकाज बंद करून पोबारा केला आहे. अवघ्या काही महिन्यांतच कंपनीने रातोरात टाळे ठोकल्यामुळे, तिथे काम करणाऱ्या तब्बल 700 कर्मचाऱ्यांची भयंकर फसवणूक झाली असून त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ ओढवली आहे.

गेल्या 5 महिन्यांपासून पगार थांबवले

मिळालेल्या माहितीनुसार, ‘थिंक टेक्नॉलॉजी इंडिया’ ही कंपनी हिंजवडी आयटी पार्कच्या फेज-२ मध्ये २०२५ साली सुरू करण्यात आली होती. नोकरी देताना या कंपनीने ‘सिक्युरिटी डिपॉझिट’च्या (सुरक्षा ठेव) नावाखाली प्रत्येक कर्मचाऱ्याकडून १५ हजार रुपये वसूल केले होते. सुरुवातीच्या काळात या कंपनीने काही कर्मचाऱ्यांना सुरळीतपणे वेतनही दिले, ज्यामुळे कर्मचाऱ्यांचा कंपनीवर विश्वास बसला. मात्र, जानेवारी २०२६ पासून या कंपनीने अचानक आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार देण्याचे थांबवले आणि त्यांचे वेतन थकवण्यास सुरुवात केली.

700 युवक रस्त्यावर

वेतनाची मागणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपनीकडून जे चेक देण्यात आले होते, तेदेखील बँकेत बाऊन्स झाल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. पगार न मिळणे आणि त्यातच कंपनी रातोरात बंद पडल्याने या ७०० तरुण-तरुणींच्या भविष्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हातातील नोकरी गेल्याने आणि कष्टाचे पैसे अडकल्याने या सर्व कर्मचाऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.

पोलिसात तक्रार दाखल

या संपूर्ण फसवणुकीनंतर संतप्त आणि हवालदिल झालेल्या कर्मचाऱ्यांनी न्याय मिळवण्यासाठी थेट हिंजवडी पोलीस स्टेशन गाठले आहे. कर्मचाऱ्यांनी पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल केली असून, फसवणूक करणाऱ्या या कंपनीच्या संचालकांवर तातडीने कायदेशीर कारवाई करत गुन्हे दाखल करण्याची तीव्र मागणी केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई व्हावी आणि आपले अडकलेले पैसे व पगार मिळावा, अशी अपेक्षा या फसवणूक झालेल्या कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

Follow Us