ॲमिनिटी स्पेसवरुन राजकारण तापणार, भाजपनं प्रस्ताव मंजूर केल्यास काय? राष्ट्रवादीचं ठरलं

| Updated on: Aug 31, 2021 | 3:37 PM

पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर अ‌ॅमिनिटी स्पेस भाड्यानं देण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार होता. ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले. एका गटानं विरोध केल्यानं भाजपला हा प्रस्ताव मांडता आला नव्हता.

ॲमिनिटी स्पेसवरुन राजकारण तापणार, भाजपनं प्रस्ताव मंजूर केल्यास काय? राष्ट्रवादीचं ठरलं
पुणे महानगरपालिका
Follow us on

पुणे : पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 270 ॲमिनिटी स्पेस भाडेतत्त्वावर देण्याच्या मुद्द्यावरून आता महापालिकेतील राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. सत्ताधारी भाजप हा प्रस्ताव बहुमताच्या जोरावर मंजूर करण्याच्या तयारीत आहे. तर दुसरीकडे सुरुवातीला प्रस्तावाला पाठींबा देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवारांच्या सुचनेनंतर या प्रस्तावाला राष्ट्रवादीने विरोध दर्शवलाय. रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडली, त्या बैठकीत अ‌ॅमिनिटी स्पेस प्रस्तावाला विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुणे महानगरपालिकेत भाजप सत्तेत असून ते बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर करण्याची शक्यता आहे.

भाजपनं प्रस्ताव मंजूर केल्यास पुढं काय?

पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर अ‌ॅमिनिटी स्पेस भाड्यानं देण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार होता. ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले. एका गटानं विरोध केल्यानं भाजपला हा प्रस्ताव मांडता आला नव्हता. आता राष्ट्रावादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट झाली असून त्यांनी विरोधाची भूमिका घेतली आहे. भाजपने महापालिकेत बहुमतच्या जोरावर हा प्रस्ताव मंजूर करून घेतला, तर राज्य सरकार तो अडवणार असंही आता महाविकास आघाडीच्या नेत्याचं म्हणणं आहे.

थकबाकी असणाऱ्या स्पेस सील करणार

पुणे शहरातील 1925 अ‌ॅमिनिटी स्पेसवर 53 कोटी रुपयांचे भाडे थकीत आहे. ज्यांचे करार संपले आहेत, भाडं थकवलं आहे, अशा अ‌ॅमिनिटी स्पेस सील करणार असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासणे यांनी दिलीय.

अजित पवारांच्या बैठकीत ठरलं, राष्ट्रवादी विरोध करणार

पुण्यात सध्या गाजत असलेल्या ॲमिनिटी स्पेसच्या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसनं रविवारी भूमिका स्पष्ट केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पाठिंबा न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अजित पवारांच्या सूचनेवरुन अ‌ॅमिनिटी स्पेसला विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांनी दिली होती.

ॲमिनिटी स्पेसचा नेमका प्रस्ताव काय?

भाजपकडून पुणे महापालिकेच्या हद्दीतल्या ॲमिनिटी स्पेस दीर्घ मुदतीसाठी खासगी विकासकांना भाडेतत्वावर देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजूर केला आहे. आता हा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे निर्णयासाठी प्रलंबित आहे.

भाजप शरद पवारांची भेट घेणार?

पुणे महापालिकेच्या 185ॲमिनिटी स्पेस आणि 85 आरक्षित जागा अशा एकूण 270 जागा दीर्घ मुदतीने भाडेतत्वावर खासगी विकासकांना देण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीत मंजूर करण्यात आला आहे. हा प्रस्ताव आता महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे प्रलंबित आहे. भाजपनं सर्वसाधारण सभेत बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव मंजूर जरी केला तरी राज्य सरकारमार्फत हा प्रस्ताव विखंडित करण्याचा इशाराही राष्ट्रवादीने दिला आहे. अजित पवारांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होण्यापूर्वी भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. भाजप पदाधिकारी राष्ट्रवादीची भूमिका निश्चित झाल्यावर शरद पवारांची भेट घेणार का हे पाहावं लागणार आहे.

इतर बातम्या:

राष्ट्रवादी काँग्रेसचं अखेर ठरलं! ॲमिनिटी स्पेसचा मुद्दा निकाली,अजित पवारांच्या उपस्थितीत मोठा निर्णय

पुण्यातल्या अॅमिनिटी स्पेसचा चेंडू शरद पवारांच्या कोर्टात? भाजपने भेटीसाठी मागितली वेळ

Pune Municipal Corporation Amenity space proposal issue if BJP passed NCP will oppose level of State Government Politics raised