Stray pigs : रस्त्याची झाली कचराकुंडी, पुणे परिसरात भटक्या डुकरांचा उच्छाद; महापालिका अद्याप पत्रप्रपंचातच…

आधीच रोगराईच्या वातावरणात परिसरातील ही अस्वच्छता आणि त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात असलेला डुकरांचा वावर अधिक घातक आहे. यावर महापालिकेने त्वरीत उपाययोजना करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

Stray pigs : रस्त्याची झाली कचराकुंडी, पुणे परिसरात भटक्या डुकरांचा उच्छाद; महापालिका अद्याप पत्रप्रपंचातच...
पुण्यातील रस्त्यांवर भटक्या डुकरांचा उच्छाद
Image Credit source: HT
| Updated on: Aug 10, 2022 | 8:30 AM

पुणे : शहरात भटक्या डुकरांचा (Stray pigs) त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. या भटक्या डुकरांच्या अनियंत्रित प्रजोत्पादनाविरोधात तक्रारी वाढल्या असूनही पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation) कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. संपूर्ण शहरात कमीत कमी 300 कचऱ्याचे क्रॉनिक स्पॉट आहेत आणि या भागांच्या आसपास डुकरे आढळतात. एकीकडे कचऱ्यामुळे वातावरण दुषित (Pollute the environment) होत असताना त्यात ही डुकरे भर घालत आहेत. डोळ्यांनी हे पाहतानाही त्रास होतो. गेल्या काही महिन्यांपासून डुकरांचा त्रास वाढला आहे. ते रस्त्यावर सगळीकडे कचरा पसरवत फिरतात आणि महापालिका मात्र यावर काहीही करत नाही, असे पद्मावती येथील एका रहिवाशाने सांगितले. तर दुसरीकडे पुणे महानगरपालिकेने डुकरांची संख्या वाढल्याचे मान्य केले आहे.

‘कारवाईची मागणी करणार’

भटक्या डुकरांच्या प्रजननात वाढ होत आहे, विशेषत: रहिवासी कचरा टाकतात अशा ठिकाणांजवळ ही संख्या मोठ्या प्रमाणावर आढळत असल्याचे निरीक्षण महापालिकेने केले आहे. पुणे महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख आशा राऊत म्हणाल्या, जेथे रहिवासी अनेकदा कचरा टाकतात, अशा ठिकाणांची आम्ही स्वच्छता करण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्व प्रादेशिक प्रभाग अधिकाऱ्यांना पत्र लिहून कारवाईची खात्री करून घेऊ. डुक्कर आणि कुत्र्यांचा प्रश्न आरोग्य विभागाकडून हाताळला जातो, त्यांनाही पत्र लिहून कारवाईची मागणी करणार आहोत, असे त्या म्हणाल्या.

‘दुर्गंधीमुळे फिरताही येत नाही’

चव्हाणनगर येथील पंचवटी सोसायटीजवळ राहणाऱ्या रहिवाशांच्या मते, आमच्या आजूबाजूला पंचवटी, काळूबाई मंदिर, विंकर हॉल आणि पद्मावतीसमोरील मोकळी जागा अशा किमान पाच ते सहा जागा आहेत, जिथे नागरिक कचरा टाकतात. जिथे कचरा आहे तिथे डुकरे आणि कुत्रे मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. दुर्गंधीमुळे परिसरात फिरता येत नाही. शिवाय सध्या पावसाळा सुरू आहे. त्यामुळे आधीच रोगराईच्या वातावरणात परिसरातील ही अस्वच्छता आणि त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात असलेला डुकरांचा वावर अधिक घातक आहे. यावर महापालिकेने त्वरीत उपाययोजना करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.