हाके आंदोलन मागे घेणार? पोलिसांनी मोर्चा अडवला, पुण्यात तणाव; पोलिसांनी काय दिली माहिती?

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा पुणे ते मुंबई मोर्चा पोलिसांनी पाटस टोलनाक्यावर अडवला. परवानगी नसल्याने पोलिसांनी मोर्चा थांबवला, मात्र हाके मुंबईकडे जाण्यावर ठाम आहेत. ओबीसींना केवळ मतांसाठी वापरले जात असल्याचा आरोप करत, मनोज जरांगे पाटलांमुळे ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याचे हाके यांनी म्हटले.

हाके आंदोलन मागे घेणार? पोलिसांनी मोर्चा अडवला, पुण्यात तणाव; पोलिसांनी काय दिली माहिती?
laxman hake
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 01, 2026 | 12:36 PM

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुण्यात मोठा मोर्चा काढला आहे. ओबीसींच्या मागण्यासाठी काढण्यात आलेला हा मोर्चा मुंबईच्या दिशेने कूच करत असतानाच तो मध्येच अडवण्यात आला आहे. पाटस टोलनाक्यावर हा मोर्चा अडवण्यात आला आहे. पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना पुढे जाण्यास मज्जाव केला आहे. बॅरिकेडिंग लावून हा मोर्चा अडवण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यातील वातावरण तापलं आहे. मोर्चाला कोणतीही परवानगी नाही. आमच्याकडूनही नाही आणि मुंबई पोलिसांकडूनही नाही, असं पुणे पोलिसांनी म्हटलं आहे. तसेच आम्ही हाकेंशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहोत, असं पोलिसांनी सांगितलं. त्यामुळे हाके मोर्चा स्थगित करणार की मुंबईच्या दिशेने कूच करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

लक्ष्मण हाके यांनी पुण्यातून मोर्चाला सुरुवात केली. नॅशनल हायवेजवळ मोर्चा येताच पोलिसांनी हा मोर्चा अडवला. याबाबत पुणे ग्रामीणचे SP संदीप सिंग गिल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही हाके यांना मोर्चा काढू नका म्हणून सूचना दिली होती. मुंबई पोलिसांनी आझाद मैदानात मोर्चा काढण्याची हाकेंना परवानगी दिलेली नाहीये. आम्हीही हाकेंना परवानगी दिली नाही. त्यामुळे मोर्चा आम्ही अडवला आहे. संवाद सुरू आहे. त्यांच्या ज्या मागण्या आहेत, त्या शासनापर्यंत पोहोचवत आहोत. तोडगा काढण्यासाठी सकारात्मक आहोत, असं संदीप सिंग गिल यांनी सांगितलं.

वाहने अडवली नाही

आमच्या गाड्या पोलिसांनी अडवल्याचा आरोप आंदोलकांनी केला होता. त्यावरही पोलिसांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही कुठल्याही गाड्या अडवल्या नाहीत. आम्ही डायव्हर्शन पॉइंट लावले आहेत. हा नॅशनल हायवे आहे. इथे ट्रॅफिक जाम झालं तर लोकांना त्रास होईल. त्यामुळे आम्ही आंदोलकांना गाड्या पार्क करण्यासाठी जागा दिल्या आहेत. त्यांना तिथे गाड्या पार्क करण्यास सांगितलं आहे. कुणाच्याही गाड्या अडवल्या नाहीत, असं सांगतानाच आम्ही संवाद साधून परिस्थिती हाताळत आहोत, अशी माहितीही गिल यांनी दिली आहे.

म्हणून रस्त्यावर उतरलो

दरम्यान, या सर्व प्रकारावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आम्ही आंदोलनावर ठाम आहोत. आम्ही सर्व मुंबईच्या दिशेने जात आहोत. पोलिसांनी अडवलं तरी आम्ही जाणारच आहोत. ओबीसींचा केवळ फक्त मतासाठी वापर केला जात आहे, असं लक्ष्मण हाके म्हणाले. यावेळी त्यांनी राज्याचे मंत्री शंभुराज देसाई यांच्यावरही टीका केली. शंभूराज देसाई नालायक माणूस आहे. त्यांना ओबीसींचे काही देणे घेणे नाही, ओबीसींचे आमदार, नेते हे पक्षाचे गुलाम झाले आहेत. मनोज जरांगे पाटील ओबीसीचे आरक्षण संपवू पाहत आहेत. त्यामुळेच आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत, असं हाके म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us