
पुणे : प्रसिद्ध संगीतकार एआर रहमान यांना पुणे पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. रहमान यांचा शो ऐन रंगात आलेला असताना पोलिसांनी त्यांचा शो बंद पाडला. त्यामुळे रहमान यांचा आणि त्यांच्या चाहत्यांचा चांगलाच हिरमोड झाला. पोलिसांनी स्टेजवर येऊन रहमान यांचा शो बंद पाडलाच, पण रहमान यांना चार खडेबोलही सुनावले. त्यामुळे रहमान यांना आपलं चंबुगबाळं आवरावं लागलं.
पुण्यातील राजाबहाद्दूर मिल परिसरात रविवारी रात्री प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान यांचा शो होता. या शोचा मोठा गाजावाजा झाला होता. रहमान येणार म्हटल्यावर त्याचे हजारो चाहते या शोला आले होते. इतकेच नाही तर पुणे पोलीस दलातील अनेक वरिष्ठ अधिकारीही कुटुंबीयांसह या कार्यक्रमाला हजर होते. परंतु रात्रीचे 10 वाजल्यानंतरही कार्यक्रम सुरूच ठेवल्याने पोलिसांनी रहमान यांना चांगलंच फैलावर घेतलं. पुणे पोलिसांनी चक्क स्टेजवर जाऊन पुणे पोलिसांनी कार्यक्रम बंद पाडलाय
रहमान यांचा शो ऐन रंगात आलेला असतानाच पुणे पोलीस निरीक्षकांनी स्टेजवर जाऊन रहमान यांचा शो बंद पाडला. 10 वाजल्यानंतरही ए आर रहमान यांचे गाणे सुरूच होते. त्यामुळे पोलीस निरीक्षकाला हा शो बंद पाडावा लागला. एवढेच नव्हे तर पोलीस निरीक्षकांनी रहमान यांना सुनावलेही. रात्री 10 वाजल्यानंतरही तुम्ही शो सुरूच कसा ठेवू शकता? रात्री 10 नंतर कार्यक्रम करण्यास कोर्टाने मनाई केलेली आहे हे तुम्हाला माहीत नाही काय? अशा शब्दात पोलिसंनी रहमान यांना तोंडावरच सुनावले. त्यानंतर रहमान यांनी पोलिसांशी कोणताही वाद न घालता बोऱ्या बिस्तर गुंडाळला आणि स्टेजच्या पाठीमागून निघून गेले.
एआर रहमान यांचा कार्यक्रम म्हटल्यावर पुणे आणि पिंपरीचिंचवडसह लांबून लोक कार्यक्रमाला आले होते. रहमान यांच्या चाहत्यांनी कार्यक्रमाला प्रचंड गर्दी केली होती. कार्यक्रमात प्रचंड जल्लोष सुरू होता. रहमान यांच्या प्रत्येक गाण्यावर त्यांचे चाहते थिरकत होते. शिट्या वाजवत होते. तसेच त्यांच्या सोलो गाण्याचा मनमुराद आनंदही लुटत होते. मात्र, पोलिसांनी रात्री 10 नंतर कार्यक्रम थांबवल्याने रहमान यांनाही कार्यक्रम बंद करावा लागला. त्यामुळे रहमान यांच्या संगीताची जादू ऐकण्यासाठी आलेल्या त्यांच्या चाहत्यांचा प्रचंड हिरमोड झाला.