VIDEO: महापालिकेतही आघाडी होणार का? राऊत भरसभेत म्हणाले, स्वाभिमानाशी तडजोड होणार नाही?

| Updated on: Sep 26, 2021 | 2:04 PM

पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेच्या मेळाव्यात संजय राऊत बोलत होते. यावेळी त्यांनी आघाडीवर भाष्य केलं. (sanjay raut reaction on maha vikas aghadi alliance in local body election)

VIDEO: महापालिकेतही आघाडी होणार का? राऊत भरसभेत म्हणाले, स्वाभिमानाशी तडजोड होणार नाही?
sanjay raut
Follow us on

पिंपरी चिंचवड: पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत काँग्रसे-राष्ट्रवादी आपल्यासोबत आली तर त्यांच्याशी युती करू. नाही आले तर त्यांच्याशिवाय सर्वच जागांवर लढू, असं सांगतानाच पण स्वाभिमानाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी दोन्ही काँग्रेसला ठणकावले. (sanjay raut reaction on maha vikas aghadi alliance in local body election)

पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेच्या मेळाव्यात संजय राऊत बोलत होते. यावेळी त्यांनी आघाडीवर भाष्य केलं. काय होईल पुढे? आघाडी आपली होईल का? त्या भानगडीत आपल्याला कशाला पडायचं ? आपल्याला एकट्याला लढण्याचीच जास्त सवय आहे. आपण सगळ्या जागांवर एकटं लढण्याचा प्रयत्न करू. झाली युती तर ठिक आहे. आलात तर तुमच्यासोबत नाही तर तुमच्याशिवाय. कशाला करता आपण रेंगाळत बसायचं? आपण सर्व जागांची तयारी केली पाहिजे. उद्या आपल्यासमोर चर्चेला बसतील. जागांची वाटाघाटी होईल. आपण सन्मानाने आघाडी करण्याचा प्रयत्न करू. पण स्वाभिमान सोडून भगव्या झेंड्याशी आपण तडजोड करणार नाही. एकदा ठरलं लढायचं तर लढू, असं राऊत म्हणाले.

आपण कमी पडलो

मागच्यावेळी चारचा प्रभाग झाला. त्याचा फटका आपल्याला बसल्याचं कुणी तरी सांगितलं. आपल्याला फटका बसला मग त्यांना का नाही बसला? ते सत्तेत आले. त्यांना का नाही फटका बसला? आपल्याला फटका बसला याचं कारण आपला पाया ढेपाळला होता. आपली संघटनात्मक बांधणी योग्य नव्हती. आपण लोकांपर्यंत पोहोचायला कमी पडलो. आपला पक्ष कमी पडला. सरकारने किती प्रभाग केले ते महत्त्वाचं नाही तुम्ही कोणत्या ध्येयाने पुढे जाता हे महत्त्वाचं आहे, असं ते म्हणाले.

आमच्या अंगावर येऊ नका

देशाच्या कानाकोपऱ्यात आपल्या पक्षाचा जयजयकार होतो आणि मुंबईच्या जवळ असलेल्या पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये आपल्याला आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागतो हे चित्रं काही चांगलं नाही. कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील पुण्यातून निवडून येतात. ठिक आहे. घासून निवडून आले असतील. यावेळेला आपण महापालिकेत घासून का होईना पण ठासून निवडून येऊ. चंद्रकांत दादांना पुण्यात येऊ द्या. हा महाराष्ट्र आहे. कोल्हापूरचे गडी पुण्यात आले त्याचं वाईट वाटत नाही. फक्त आमच्या अंगावर येऊ नका. एवढंच आम्हाला सांगायचं आहे. कोणीही आमच्या अंगावर येण्याचा प्रयत्न करू नका, असा इशारा त्यांनी दिला.

आपल्या फुग्यातील हवा का निघून जाते?

इतक्या वर्षानंतरही आपण तेच बोलतो. घराघरात सेना पोहोचली पाहिजे. का पोहोचली नाही ते सांगा. वर्षानुवर्ष आमदार आणि खासदार आपण निवडून आणतो. पण महापालिका आली की आपल्या फुग्यातील हवा का निघून जाते? शिवसेनेचं यश जे आहे त्या मागे महापालिकेतील काम आहे. महापालिकेच्या कामामुळेच आपण देशाच्या तख्तापर्यंत पोहोचलो आहे. अशा प्रकारचं काम पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये झालं पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.

आपलाच महापौर झाला पाहिजे

दिल्लीमध्ये मी राहतो. लोकांना मी पत्ता सांगतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्यासमोर राहतात. त्यामुळे लोक मलाही ओळखतात. ही शिवसेनेची ताकद आहे, असं ते म्हणाले. आता भोसरीमध्ये मेळावा सुरू आहे. स्टेजवर मोठी गर्दी जमली आहे. मात्र, भोसरी भागात एकही नगरसेवक आपला निवडणून आला नाही ही खंत आहे. या स्टेजवर बसलेल्यांनी प्रत्येकी तीन नगरसेवक निवडून आणले तरी महापालिकेत आपली सत्ता येईल. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आपलाच महापौर होईल. त्यासाठी प्रयत्न करा, असं आवाहन राऊत यांनी केलं. महाराष्ट्रातील सत्ता आपली आहे. नुसतं पद आहे म्हणून नाही तर शिवसैनीकच्या मनगटात ताकद आहे म्हणून आपली सत्ता आहे, असंही ते म्हणाले. (sanjay raut reaction on maha vikas aghadi alliance in local body election)

संबंधित बातम्या:

55 ला आमचा मुख्यमंत्री होतो तर मग 40-45 ला महापौर का नाही? जे राज्यात केलं तेच पुणे पिंपरी चिंचवडमध्ये करणार राऊत?

अजित पवारांना सांगू आमचे ऐका नाही तर आज मुख्यमंत्री दिल्लीला गेलेच आहेत, राऊतांचं थेट आव्हान?

मुंबईतील शाळा सुरू करण्याचा फॉर्म्युला ठरला; वर्षा गायकवाड आणि पालिका आयुक्तांच्या चर्चेतून निघाला मार्ग

(sanjay raut reaction on maha vikas aghadi alliance in local body election)