Vidhan Parishad Election Results : महायुतीची हवा गुल होताच पवार गटाच्या बड्या नेत्याचं सूचक विधान; म्हणाला, आम्ही 2029…
विधान परिषदेच्या पदवीधर-शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत शरद पवार गटाने दमदार पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. महायुतीला मोठा धक्का बसत असताना, पवार गटाचे दोन्ही उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. या निकालानंतर नेते अंकुश काकडे आणि शशिकांत शिंदे यांनी मतदारांचे बदललेले कौल आणि २०२९ च्या तयारीबाबत सूचक विधाने केली.

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या 5 जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. या निवडणुकीत महायुतीचे 3 तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार आघाडीवर आहेत. या निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा जिंकण्याचं महायुतीचं स्वप्न भंगलं असून महायुतीसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे शरद पवार गटाचं राज्याच्या राजकारणात कमबॅक होताना दिसत आहे. पवारांचे दोन्ही उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे पवार गटात जल्लोषाचं वातावरण आहे. शरद पवार गटाचे नेते अंकुश काकडे यांनी या पार्श्वभूमीवर एक सूचक विधान केलं आहे. त्यावर तर्क वितर्क लढवले जात आहेत.
शरद पवार गटाच्या उमेदवार हर्षदा देशमुख आणि प्रतापसिंह पाटील यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. त्यावर शरद पवार गटाचे नेते अंकुश काकडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हर्षदा देशमुख यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने प्रचार केला होता. त्यांनी कोणावरही टीका केली नव्हती. त्या अत्यंत सकारात्मक पद्धतीने मतदारांना भेटल्या होत्या. त्यांनी मोठमोठ्या जाहिराती लावून प्रचार केला नव्हता. त्यांनी फक्त मतदारांसोबत संवाद साधत प्रचार केला. त्याचं फळ आता मिळत आहे, असं अंकुश काकडे म्हणाले.
मतदारांचा कौल बदलतोय
सुशिक्षित मतदार आता जागृत झाला आहे. कशा पद्धतीने शासकीय यंत्रणा हातात घेतल्या जातात याची त्यांना कल्पना आहे. हे लोकांना आता समजत आहे. आमचा निकाल शंभर टक्के लागला आहे. आम्ही दोन उमेदवार दिले होते आणि दोन्ही उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. मतदारांचा कौल बदलत आहे. आता आम्ही 2029 ची वाट पाहत आहोत, असं सूचक विधान काकडे यांनी केलं आहे.
आमच्यासाठी टर्निंग पॉइंट
पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील सर्व मतदारांचे मी आभार मानतो. पुणे आणि मराठवाड्यातील आमचे दोन्ही उमेदवार आघाडीवर आहेत. आजही मराठवाडा आणि पुण्यातली जनता पवारांवर प्रेम करते. सुशिक्षित आणि चांगले उमेदवार दिल्यानंतर असा निकाल येतो. आमच्यासाठी हा एक टर्निंग पॉईंट होईल. आमचे दोन्ही उमेदवार विजयी होतील, याची मला खात्री आहे, असं शशिकांत शिंदे म्हणाले.
मी पक्षाचा प्रदेश अध्यक्ष झाल्यापासून ही पहिली निवडणूक विधान परिषदेची लागली होती. माझ्या अध्यक्षपदाच्या काळात हा विजय मिळाला, भविष्यामध्ये पक्षासाठी हा विजय प्रेरणा देणारा असेल. महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण होतं. निवडणूक प्रचारासाठी आमचे सर्व नेते आले होते. आमचे मित्र पक्षही आले होते. महायुतीच्या विरोधात आम्ही काम केलं. त्याचा हा परिणाम आहे, असं ते म्हणाले.