फडणवीस प्राथमिक शाळेत असतील म्हणून…; शरद पवार यांनी इतकी जहरी टीका का केली?

| Updated on: Jun 26, 2023 | 9:30 AM

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते बारामतीत मीडियाशी संवाद साधत असताना ते बोलत होते.

फडणवीस प्राथमिक शाळेत असतील म्हणून...; शरद पवार यांनी इतकी जहरी टीका का केली?
sharad pawar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

बारामती : एकनाथ शिंदे यांनी केली तर बेईमानी आणि शरद पवार यांनी केली तर मुत्सद्देगिरी असं कसं चालेल? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. फडणवीस यांच्या या टीकेचा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी समाचार घेतला आहे. मी बेईमानी कधी केली? देवेंद्र फडणवीस यांनी सांगावं? असा सवाल करतानाच मी स्थापन केलेलं सरकार हे सर्वसमावेशक होतं. त्यात जनसंघ म्हणजे आताचा भाजपही होता. कदाचित हा इतिहास देवेंद्र फडणवीस यांना माहीत नसेल. त्यांचं वाचन कमी असेल. फडणवीस तेव्हा प्राथमिक शाळेत असतील, अशी जहरी टीका शरद पवार यांनी केली. ते मीडियाशी संवाद साधत होते.

मी बेईमानी कधी केली? कधी केली बेईमानी फडणवीस यांनी सांगावं. 1977 मध्ये आम्ही सरकार बनवलं. त्यावेळचा जनसंघ म्हणजे आताचा भाजप माझ्यासोबत होता. उत्तमराव पाटील भाजपचे नेते होते. ते माझ्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते. फडणवीस लहान होते तेव्हा त्यामुळे त्यांना कळलं नसेल. त्यांना पूर्वीचा इतिहास माहीत नसेल. मी जे सरकार बनवलं ते सर्वांना घेऊन केलं. त्या सरकारमध्ये जनसंघाचे हशू आडवाणी होते. आणखी काही सदस्य होते. फडणवीस कदाचित प्राथमिक शाळेत असतील, त्यामुळे त्यांना त्याची माहिती नसेल. त्यामुळे अज्ञानापोटी ते असं स्टेटमेंट करतात. त्यापैकी वेगळं काही नाही, असं शरद पवार म्हणाले.

हे सुद्धा वाचा

ओबीसीच्या मुद्द्यावरून फटाकरलं

राष्ट्रवादी केवळ ओबीसींना दाखवण्यापुरते पदे देते, असा आरोपही फडणवीस यांनी केला होता. फडणवीस यांच्या या आरोपातील हवाच पवार यांनी काढली. फडणवीस यांनी पुन्हा आपलं अज्ञान दाखवलं आहे. राष्ट्रवादीचे पहिले प्रदेशाध्यक्ष छगन भुजबळ होते. भुजबळ कोण आहेत? त्यानंतर मधुकर पिचड प्रदेशाध्यक्ष होते, ते कोण आहेत? त्यानंतर सुनील तटकरे अध्यक्ष झाले ते कोण आहेत? हे सर्व नेते ओबीसी आहेत. ही सर्व यादी पाहिली तर फडणवीस यांचं वाचन किती आहे माहीत नाही. पण ते या गोष्टींची नोंद न घेता ते विधान करत आहेत. त्यांनी जो प्रश्न विचारला तो वास्तवतेला धरून नाही, असंही पवार म्हणाले.

निवडणुकीनंतरच कळेल

तेलंगनाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात कांद्याचा प्रश्न हाती घेतला आहे. संपूर्ण राज्याचा विचार केला तर कांदा हे पिक कुठे आहे? विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात कांदा पिक घेतलं जात नाही. नाशिक, धुळे आणि पश्चिम महाराष्ट्रात कांदा पिक घेतलं जातं. त्यांच्यासाठी हे पिक महत्त्वाचं आहे. काही लोकांनी इथून हैदराबादेत कांदा नेला. तिथे त्यांची काही फजिती झाली हे पाहा. राजकीय दृष्ट्या काही वेगळं करू शकतो हे दाखवण्याचा केसीआर यांचा प्रयत्न आहे. सेवा करत असेल तर स्वागत आहे, असं सांगतानाच केसीआर यांची महाराष्ट्रातील ताकद किती हे निवडणुकीनंतरच कळेल, असंही ते म्हणाले.

बावनकुळेंचं विधान पोरखेळ

विरोधी पक्षाचे 19 पंतप्रधान भेटले होते, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती. त्यावरून पवार यांनी बावनकुळे यांना फटकारलं. असं भाष्य करणं पोरखेळपणा आहे. त्या बैठकीत पंतप्रधानपदावर चर्चा झाली नाही. महागाई, बेरोजगारी आणि धार्मिक तणावावर चर्चा झाली. राज्य आणि धर्म आणि यातून मतभेद वाढणं चिंताजनक आहे. त्याला आवर घालण्यासाठी चर्चा झाली.

काही तथाकथित नेते बैठकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. अरे लोकशाहीत बैठक घेऊ शकत नाही का? बावनकुळे म्हणाले, बैठक कशाला घेतली? दुसऱ्या दिवशी मुंबईत त्यांच्या मित्र पक्षाची बैठक होणार असल्याचं बावकुळे यांनी सांगितलं. तुमच्या बैठका चालतात. आमच्या का नाही चालत? असा सवाल त्यांनी केला.

ती सर्वांचीच भावना

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. हा निर्णय कोणी एकटा घेत नाही. पक्षातील प्रमुख नेते निर्णय घेतील. सर्वांनीच पक्षाच्या कामात भाग घ्यावा अशी सर्वांची भावना आहे. तेच मत अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. त्यापलिकडे त्यात काय नाही, असंही ते म्हणाले.