टोकाचं राजकीय वैर, पण आता कौतुकाचा वर्षाव, पक्षप्रवेश करताच आढळराव पाटील मोहिते पाटील यांच्याबद्दल म्हणाले….

| Updated on: Mar 26, 2024 | 6:40 PM

शिवाजी आढळराव पाटील यांनी आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलं. यावेळी शिवाजी आढळराव पाटील यांनी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

टोकाचं राजकीय वैर, पण आता कौतुकाचा वर्षाव, पक्षप्रवेश करताच आढळराव पाटील मोहिते पाटील यांच्याबद्दल म्हणाले....
आढळरावांकडून मोहिते पाटलांवर कौतुकाचा वर्षाव
Follow us on

शिवसेना नेते शिवाजी आढळराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रूत आहे. शिवाजी आढळराव पाटील हे राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी चर्चा सुरु असताना मोहिते पाटलांना याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी थेट राजकारणातून संन्यास घेण्याचा इशारा दिला होता. आढळराव पाटील राष्ट्रवादीत आले तर आपण राजकारण सोडू, असं मोहिते पाटील म्हणाले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलीप मोहिते पाटील यांची भेट घेऊन मनधरणी केली होती. त्यानंतर आज अखेर शिवाजी आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी शिवाजी आढळराव पाटील यांनी दिलीप मोहिते पाटील यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

“दिलीप मोहिते पाटील हे माझे खऱ्या अर्थाने जवळचे मित्र आहेत. तसं माझं त्यांचं काही मतभेद असण्याचं कारण नाही. त्यांचा राजकीय जन्म जिथून झाला तसाच मी सुद्धा त्या पक्षामध्ये काम केलं. राजकारण करत असताना समोरासमोर काहीतरी भांड्याला भांडं लागतं. पण राजकारणाची समीकरणे बदलल्यानंतर सर्व काही विसरुन आपण एकदिलाने नवीन समीकरणांशी जुळवून घेतो आणि काम करतो. तसे आमचे दिलीपराव मोहिते पाटील स्वभावाने खूप चांगले आहेत. आमच्यात वैयक्तिक असे हवेदावे राहिले नाहीत. जे काही झालं ते सामाजिक विषयावर झालं”, अशा शब्दांत शिवाजी आढळराव पाटील यांनी मोहिते पाटलांवर कौतुकाचा वर्षाव केला.

‘मी तसा हाडाचा राजकारणी नाही’

“आपल्याला उत्सुकता असेल, राजकारण बदललं आहे, राजकारणाची समीकरणे बदलली आहेत. आपल्याला सगळ्यांना माझा इतिहास आणि पार्श्वभूमीवर माहिती आहे. पण आवर्जून सांगू इच्छितो की, मी तसा हाडाचा राजकारणी नाही. माझ्या घरात साधा ग्रामपंचायत सदस्यही कुणी नव्हतं. मला कुठलीच पार्श्वभूमी नाही. या आंबेगाव तालुका आणि शिरुर लोकसभेतील मायबाप जनतेने मला आशीर्वाद दिले. दिलीप वळसे पाटील आणि मी मिळून काही प्रकल्प सुरु केले. त्यामध्ये भीमा शंकर सहकारी साखर कारखाना असेल. तिथून माझ्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली”, असं आढळराव पाटील म्हणाले.

आढळराव पाटील यांच्याकडून दिलीप वळसे पाटील यांचंही कौतुक

यावेळी शिवाजी आढळराव पाटील यांनी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचंही कौतुक केलं. “या विधानसभा मतदारसंघात गेल्या 20 वर्षात विकास काय असतो हे दाखवून दिलं, ज्यांचा मी विरोधी पक्षात असताना वेळोवेळी जाहीरपणे कबुली दिली, तालुक्यात जे महत्त्वाचे प्रकल्प झाले ते दिलीप वळसे पाटील यांच्यामुळे झाले. मी अभिमानाने सांगत आलो की, ज्यांनी उच्च तंत्र शिक्षण मंत्रीपदाचा कारभार करत असताना तालुक्याला मोठी देणगी दिली ती इंजिनीअरींग कॉलेजच्या रुपाने. त्यांच्यावर गृहमंत्रीपदाची जबाबदारी पडली आणि त्यांनी तालुक्याला न्याय दिला. मंचरचं पोलीस ठाणे, घोडेगावची पोलीस कर्मचारी वसाहत आणि अन्य पोलीस ठाणे यांचं काम केलं”, अशा शब्दांत मोहिते पाटील यांनी मंत्री दिलीप मोहिते पाटील यांचं कौतुक केलं.

“दिलीप वळसे आणि माझे सलोख्याचे संबंध होते. मात्र राजकारणात महत्वकांक्षा वाढते. यातून आमच्यात वाद झाले. मात्र आम्ही कधी ही एकमेकांवर वैयक्तिक कोणते ही भाष्य केले नाही. 2004 साली मी लोकसभेत आणि दिलीप वळसे यांनी विधानसभेत उभं राहायचं ठरलं. त्यावेळी मला शिवसेनेकडून उभं राहण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी ऑफर दिली. मी 35 दिवसांत खासदार झालो. बाळासाहेबांनी विश्वास दाखवल्यानं मी खासदार होऊ शकलो. पहिली निवडणूक ही न विसरणारी आहे. 2009 साली मतदारसंघाची नव्यानं निर्मिती झाली”, असं शिवाजी आढळराव पाटील म्हणाले.