टाटा. बिर्ला, अंबानी… कुणीही या, आमचं गाव विकत घ्या, महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक का विकताहेत गाव?
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील तुळशी गाव भीषण पाणीटंचाईमुळे विक्रीसाठी उपलब्ध केले आहे. दुष्काळ आणि सीना-माढा जलसिंचन योजनेच्या उपेक्षिततेमुळे त्रस्त ग्रामस्थांनी, ज्यात तरुणही सामील आहेत, टाटा, बिर्ला, अंबानी यांसारख्या उद्योजकांना गाव विकत घेण्याचे आवाहन केले आहे.

राज्यात दुष्काळाची दाहकता वाढत आहे. अशातच पाणी नसल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील एका गावातील ग्रामस्थानी अख्खं गावच विकायला काढलं आहे. माढा तालुक्यातील तुळशी गाव विक्रीसाठी उपलब्ध आहे. तुळशी गावातील तरुणांनी आणि ग्रामस्थांनी एकत्रित येऊन ग्रामपंचायतीसह संपूर्ण गाव विकायचा निर्णय घेतला आहे. गावात तसे बोर्डही लावण्यात आले आहेत. टाटा, बिर्ला आणि अंबानी… कुणीही यावं आणि आमचं गाव विकत घ्यावं, असं या ग्रामस्थांचं म्हणणं आहे.
दुष्काळामुळे गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पावसाळा सुरू असतानाच ही पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या तुळशीच्या गावकऱ्यांनी उद्विग्न होऊन गाव विकण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचे म्हणजे ग्रामसभेत गाव विकण्याचा ठरावही करण्यात आला आहे.
या गावातील लोक गेल्या काही वर्षापासून सीना माढा उपसा जलसिंचनातून पाणी मिळण्याची मागणी करत आहेत. उजनी धरणातून 2000 मध्ये सीना-माढा योजना सुरू करण्यात आली. सुरुवातीच्या काळात तुळशी गावाला या योजनेतून बाहेर ठेवण्यात आलं होतं.
निर्णय झाला, पण पाणी कुठाय?
त्यानंतर ग्रामस्थानी अधिकाऱ्यांना वारंवार निवेदनं दिले. आंदोलने केली. आमच्या गावाचा या योजनेत समावेश करा, गावकरी अशी मागणी सातत्याने करत होते. पण त्यांच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही. बऱ्याच संघर्षानंतर अखेर या गावाचा योजनेत समावेश करण्यात आला. पण योजनेत समावेश केल्यानंतरही अजूनपर्यंत गावात पाण्याचा थेंबही आला नाही, असा आरोप या गावकऱ्यांनी केला आहे.
यंदा पाऊस कमी झाल्याने गावकऱ्यांच्या अडचणी आणखीनच वाढल्या आहेत. पिण्याच्या पाण्यासोबतच शेतीसाठी पुरेसं पाणी नाहीये. पाणी टंचाईमुळे त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या पिकांवर पडत आहे. जर सीना-माढा योजनेचं पाणी आमच्या गावापर्यंत आलं तर गावची अनेक वर्षाची समस्या दूर होईल, असं या गावकऱ्यांचं म्हणणं आहे.
12 शेतकऱ्यांचं उपोषण
उजनी पाणी संघर्ष समितीच्या नेतृत्वात 14 ऑक्टोबर रोजी तुळशी गावात 12 शेतकऱ्यांनी आमरण उपोषण केलं होतं. पाण्याच्या मागणीसाठी हे उपोषण करण्यात आलं होतं. ग्रामस्थांच्या मते, उपोषणाच्या पाच दिवसानंतर प्रशासनाकडून यावर कोणताच मार्ग काढला नाही. त्यानंतर या गावकऱ्यांना अधिक उग्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
टाटा, बिर्ला, अंबानी गाव खरेदी करा
प्रशासनाच्या उदासिनतेमुळे गावकरी अधिकच हतबल आणि निराश झाले आहेत. या गावकऱ्यांना गावात एक बॅनर लावला आहे. त्यावर, आमचा गाव विक्रीसाठी उपलब्ध आहे. कोणी तरी खरेदी करा, असं लिहिलंय. टाटा, बिर्ला आणि अंबानी यांनी येऊन आमचं गाव खरेदी करावं, आम्हाला पाणी द्यावं, असं या गावकऱ्यांनी म्हटलं आहे.
पाण्याची समस्या केवळ शेतीपुरतीच नाहीये. तर दैनंदिन आयुष्यावरही त्याचा परिणाम झाला आहे. त्याचा परिणाम सामाजिक व्यवस्थेवरही झाला आहे. गावात पाणी नसल्याने मुलांची लग्न होत नाहीयेत, असा दावा या गावकऱ्यांनी केला आहे. सीना माढा उपसा जलसिंचनातून लवकरात लवकर गावाला पाणी दिलं जावं, अशी मागणीही या गावकऱ्यांनी केली आहे.
