Supriya Sule : पुणे-बंगळूरू महामार्गावर वाकड ते नऱ्हेदरम्यान साऊंडप्रुफ भिंत उभारा; सुप्रिया सुळेंची नितीन गडकरींकडे मागणी

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना सुप्रिया सुळेंनी पत्र लिहिले आहे. त्यांनी या पत्राचा फोटो ट्वीटरवर पोस्ट केला आहे. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाढलेली वाहतूक आणि त्यामुळे होणारे ध्वनिप्रदुषण या समस्येबाबत लक्ष घालावे, अशी विनंती त्यांनी केली आहे.

Supriya Sule : पुणे-बंगळूरू महामार्गावर वाकड ते नऱ्हेदरम्यान साऊंडप्रुफ भिंत उभारा; सुप्रिया सुळेंची नितीन गडकरींकडे मागणी
सुप्रिया सुळे/नितीन गडकरी
Image Credit source: tv9
| Updated on: Jun 18, 2022 | 10:32 AM

पुणे : पुणे-बंगळूरू महामार्गावर साऊंडप्रुफ भिंत उभारा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदास सुप्रिया सुळे यांनी केली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना पत्र लिहून त्यांनी ही मागणीक केली आहे. हायवेवरून जाणाऱ्या वाहनांच्या आवाजाचा त्रास बाजूच्या नागरिकांना होत आहे. हे ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी साऊंडप्रुफ भिंत उभारा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तर चांदणी चौकात सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीवरही लक्ष घाला, असे पत्रात म्हटले आहे. पुणे-बंगळूरू महामार्गावर (Pune-Bangalore Highway) विविध ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना हा नागरिकांना करावा लागत आहे. पुणे-बंगळुरू या राष्ट्रीय महामार्गावरील सातत्याने होणारी वाहतूक कोंडी आणि त्यामुळे होणारे ध्वनी प्रदूषण हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. येथील नागरिकांना याचा त्रास व्हायला लागला आहे. याची दखल सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी घेतली आहे.

विविध संस्थांकडून होतेय मागणी

सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भात ट्वीट केले आहे. त्यात म्हटले आहे, की पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. त्यामुळे वाहतूककोंडी तर होतेच शिवाय ध्वनिप्रदूषणही होते. ही समस्या सोडविण्यासाठी पुण्यातील या महामार्गावर वाकड ते नऱ्हे यादरम्यान साऊंडप्रुफ वॉल, बॅरियर उभारावेत, अशी विनंती गृहनिर्माण संस्था आणि विविध संस्था करत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

ट्विटरवर पोस्ट केले पत्र

याचप्रश्नाबाबत त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्रही लिहिले आहे. त्यांनी या पत्राचा फोटो ट्वीटरवर पोस्ट केला आहे. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाढलेली वाहतूक आणि त्यामुळे होणारे ध्वनिप्रदुषण या समस्येबाबत लक्ष घालावे, अशी विनंती त्यांनी केली आहे.

अपघातांबाबतही व्यक्त केली चिंता

नितीन गडकरी आणि NHAI प्राधिकरण या प्रकरणाची चौकशी करून मदत करतील, अशी विनंती सुळे यांनी केली आहे. चांदणी चौकात मेट्रो आणि उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. सामान्य नागरिकांना याचा प्रचंड त्रास होत आहे. त्याचबरोबर याच महामार्गावर नवले पूल परिसरात होणारे अपघात, याविषयीही त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.