Dry Day: असा कसा ड्राय डे, 40 पैकी फक्त 3 पोलीस स्टेशनच्या हद्दीत दारु बंदी, पुण्यातील अजब निर्णयाची सगळीकडे चर्चा
Pune Dry Day: गणेशोत्सवाच्या काळात कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहण्यासाठी ड्राय डे पाळला जातो. पण पुण्यातील गणेशोत्सवामध्ये तीनच पोलीस स्टेशनच्या हद्दीत ड्रायडे जाहीर करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्काचा अजब निर्णयाची आता राज्यभर चर्चा होत आहे.

डीजे आणि साऊंड सिस्टिमच्या दणदणाटाविरोधात विद्यानंद बापट यांनी आवाज उठवल्यानंतर पुणे पुन्हा राज्याच्या नकाशावर आले. गणेशोत्सवाच्या काळात कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहण्यासाठी ड्राय डे पाळला जातो. पण पुण्यातील गणेशोत्सवामध्ये तीनच पोलीस स्टेशनच्या हद्दीत ड्रायडे जाहीर करण्यात आला आहे. शहरात 40 पोलीस स्टेशन असताना तीनच पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ड्राय डे आदेश काढले आहेत. म्हणजे एका पावलावर मद्याचे दुकान तर दुसर्या पावलावर ड्राय डे अशी विचित्र परिस्थिती मद्यप्रेमींसाठी झाली आहे. आता राज्य उत्पादन शुल्काच्या अजब निर्णयाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
या तीन पोलीस स्टेशनच्या हद्दीत दारुबंदी
पुणे पोलीस आयुक्तालयातील खडक, विश्रामबाग आणि फरासखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत ड्राय डे घोषित केला आहे. गणेश आगमन म्हणजे 14 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर या दरम्यान विसर्जन मिरवणुकी पर्यंत ड्रायडे असल्याची घोषणा करण्यात आली आहे. शहरातील इतर पोलीस स्टेशनच्या हद्द अगदी एका पावलावर बदलतात त्यामुळे इतर ठिकाणी ड्रायडे का नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नियमांमुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे हसे
पुण्यातील मध्यवर्ती भागात एक गल्ली बदलली की पोलीस ठाण्याची हद्द बदलते. खडक, विश्रामबाग आणि फरासखाना हद्दीत दारु दुकानं बंद असली तरी अवघ्या काही पावलांच्या अंतरावरील दुसर्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक्यात मद्यविक्री होणार आहे. अशा विचित्र निर्णयामुळे दारुबंदीचे, ड्रायडेच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जाणार आहे. या निर्णयामुळे राज्य उत्पादन शुल्क विभाग हसे करून घेत असल्याची टीका पुणेकर करत आहेत.
पाच मिनिटांच्या अंतरावर मद्यविक्री होत असले तर कायदा आणि सुव्यवस्था कशी राखली जाईल असाही पुणेरी टोलाही लगावला जात आहे. हा ड्राय डे आहे की मद्यप्रेमींची सोय आहे असा टोलाही पुणेकरांनी उत्पादन शुल्क विभागाला लगावला आहे. सोशल मीडियावर या निर्णयाची खिल्ली उडवली आहे. या निर्णयाचा फेरविचार करण्याचा सल्लाही अनेक पुणेकरांनी उत्पादन शुल्क विभागाला दिला आहे.