गव्हर्नरला जागा लागतेच किती? छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक राज्यपाल भवनात करा, उदयनराजे यांची मोठी मागणी

Udayanraje Bhosale Big Demand : छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारकाचे काय झाले असा सवाल विरोधक सातत्याने विचारत आहेत. त्यातच आता छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मोठी मागणी केली आहे. स्मारकाच्या मुद्दावर ते आक्रमक दिसले.

गव्हर्नरला जागा लागतेच किती? छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक राज्यपाल भवनात करा, उदयनराजे यांची मोठी मागणी
छत्रपती शिवाजी महाराज स्मारक
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Apr 11, 2025 | 10:23 AM

छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारकाचे काय झाले? असा सवाल सातत्याने विरोधक विचारतात. स्मारक होणार कधी याविषयी चर्चा सुरू असतानाच आता भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मोठी मागणी केली आहे. महाराजांचा वारंवार अवमान करणाऱ्यांविरोधात त्यांनी कायदा आणण्याची मागणी रेटली आहे. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पण याप्रकरणी निवेदन दिले आहे. केंद्रीय गृहमंत्री उद्या रायगड दौऱ्यावर असतानाच आता खासदार उदयनराजे यांनी अजून एक मोठी मागणी केली आहे.

राज्यपालांना जागा लागतेच किती?

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाबाबत खासदार उदयनराजे आक्रमक दिसले. शिवाजी महाराजांचं राष्ट्रीय स्मारक दिल्लीत व्हावं अशी मागणी त्यांनी केली. अरबी समुद्रात शिवरायांचं स्मारक व्हावं, अशी मागणी त्यांनी लावून धरली. जर अरबी समुद्रात स्मारक होणे शक्य नसेल तर मग राज्यपाल भवनात हे स्मारक व्हावं अशी मागणी त्यांनी केली. राज्यपाल भवनाची 48 एकर जमीन आहे. त्यामुळे राज्यपाल भवनात शिवरायांचं स्मारक व्हावे अशी मागणी त्यांनी केली. राज्यपाल महोदयांना जागा लागतेच किती? असा सवाल ही त्यांनी केला.

महात्मा फुले यांना अभिवादन

उदयनराजे भोसले यांनी महात्मा फुले जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले. शिवरायांच्या पश्चात अनेक समाज सुधारक यांनी केलं त्यापैकी महात्मा ज्योतीबा फुले एक होते. महात्मा फुले व्हिजनरी होते. आयुष्यभर कष्टकरून संपत्ती गोळा केली ती समाज सुधारणेसाठी वापरली, असे ते म्हणाले. थोरले प्रतापसिंह महाराज यांनी स्त्री शिक्षणाची शाळा सुरू केली होती, असे ते म्हणाले.

उद्या शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी आहे. महापुरूषांबाबतीत जरा कोणी अपमानास्पद बोलत असेल तर यासाठी कायदा केला जावा.शिवाजी महाराज यांचा शासनामार्फत ग्रंथ प्रकाशित झाला नाही तो व्हावा. सेन्सार बोर्डात एक इतिहासकार असावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

मंगेशकर हॉस्पिटल ताब्यात घ्या

अक्षम्य निष्काळजीपणामुळे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये एका गर्भवतीचा मृ्त्यू ओढवल्याचे प्रकरण समोर आले. याप्रकरणावर उदयनराजे यांनी संताप व्यक्त केला. मंगेशकर हॉस्पिटल चॅरिटी किती करते, असा सवाल त्यांनी केला. या रुग्णालयाचं ऑडिट झाले पाहिजे. हे रुग्णालय ताब्यात घ्यायला हवे अशी मागणी उदयनराजे यांनी केली.

वाघ्याची समाधी हटवा

रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवर उदयनराजे भोसले आक्रमक झाले. त्यांनी कुत्र्‍याची समाधी तात्काळ हटवण्याची मागणी केली. पैसे हे महाराजांच्या समाधीसाठी दिले होते असे ते म्हणाले. कुत्र्याच्या समाधीला दणका द्या असे ते म्हणाले. त्यांनी वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी केली.