सोन्याचा महागाईचा रेकॉर्ड; 33 तासांमध्ये इतकी घेतली भरारी, ग्राहकांच्या तोंडचे पळाले पाणी
Gold Rate Today : अमेरिकेच्या आक्रमक व्यापारी धोरणामुळे आणि टॅरिफ वॉरमुळे जगात भीतीचे वातावरण असतानाच, सोने आणि चांदी स्वस्त होण्याचा दावा करण्यात येत आहे. पण या दोन्ही धातुनी महागाईचा उच्चांकी सूर मारत हा दावा खोडून काढला आहे. दोन्ही धातुत मोठी वाढ झाली आहे.

अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये सध्या टॅरिफ वॉर सुरू आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र देशांसह शत्रू देशांवर आयात शुल्क वाढीचा बॉम्ब फेकला आहे. त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रावर दिसून येत आहे. वायदे बाजारात गुरुवारी सोन्याने नवीन रेकॉर्ड केला. विशेष म्हणजे गेल्या 33 व्यापारी सत्रात सोन्याच्या किंमतीत जवळपास 4900 रुपयांची मोठी वाढ दिसून आली. तज्ज्ञांच्या मते, गेल्या दोन दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ दिसून येत आहे. अमेरिका आणि चीनमध्ये भडकलेले व्यापारी युद्ध त्यासाठी कारणीभूत असल्याचा दावा करण्यात येत आहे. अमेरिकेने अनेक देशांवरील टॅरिफ कार्ड सध्या 90 दिवसांसाठी टाळले आहे. तर दुसरीकडे चीनवर टॅरिफ 125 टक्क्यांपर्यंत वाढवले आहे. दुसरीकडे चीनने सुद्धा अमेरिकेला जशाच तसे उत्तर दिले आहे.
केंद्रीय बँकांची सोन्याची लयलूट
टॅरिफ वॉर भडकल्याने जगभरातील सरकारी मध्यवर्ती बँकांनी सोन्याची खरेदी वाढवली आहे. तर चीनमध्ये गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणुकीला जोर चढला आहे. सध्या गुंतवणूकदार सोन्यातील गुंतवणूक फायदेशीर मानत आहेत. सोन्याच्या किंमतीत मोठी तेजी दिसून येत आहे. तज्ज्ञांच्या मते येत्या काही दिवसात सोन्याच्या किंमतीत अजून वाढ दिसून येऊ शकते.
सोन्याच्या किंमती भडकल्या, नवीन रेकॉर्ड केला
देशातील वायदे बाजारात मल्टि कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याच्या किंमतींमध्ये गुरूवारी मोठी तेजी दिसून आली. काल महावीर जयंती असल्याने वायदे बाजार संध्याकाळी 5 वाजता उघडला. MCX वरील आकड्यांवर नजर टाकली असता, सोन्याचा भाव 7 वाजून 55 मिनिटांवर 1,946 रुपयांच्या तेजीसह 91,750 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचला. तर व्यापारी सत्रादरम्यान सोन्याची किंमत 2,046 रुपयांच्या तेजीसह 91,850 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या रेकॉर्ड उच्चांकावर पोहचली. सोन्याची किंमत व्यापारी सत्रात 91,464 रुपयाने सुरु झाली होती. सोन्याच्या किंमती अजून भडकण्याची शक्यता आहे.
33 तासांत 4,900 रुपयांची तेजी
गेल्या 33 व्यापारी सत्रात सोन्याच्या किंमतीत जवळपास 4,900 रुपयांची तेजी दिसून आली. 7 एप्रिलनंतर सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ दिसून येत आहे. एमसीएक्सच्या आकडेवारीनुसार, सोन्याची किंमत 86,928 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आली होती. जेव्हा गुरुवारी व्यापारी सत्र सुरू झाले. त्यावेळी संध्याकाळी 5 वाजता सोन्याची किंमत दोन तासात 91,850 रुपयांच्या रेकॉर्ड उच्चांकावर पोहचला. म्हणजे सोन्याने अवघ्या 32 व्यापारी तासात 4,922 रुपयांपर्यंत महागले. म्हणजे सोन्याच्या किंमतीत 5.50 टक्क्यांची तेजी दिसून आली.
