कोरोना लसीच्या प्रभावावर प्रश्नचिन्ह? लस घेऊनही IAS कौस्तुभ दिवेगावकर कोरोना पॉझिटिव्ह, उस्मानाबादेत खळबळ

| Updated on: Feb 21, 2021 | 8:16 AM

कोरोनाची लस घेतल्यानंतर तब्बल 2 आठवड्याने उस्मानाबाद जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. | Kaustubh Divegaonkar

कोरोना लसीच्या प्रभावावर प्रश्नचिन्ह? लस घेऊनही IAS कौस्तुभ दिवेगावकर कोरोना पॉझिटिव्ह, उस्मानाबादेत खळबळ
कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हाधिकारी उस्मनाबाद
Follow us on

उस्मानाबाद : कोरोना लसीच्या प्रभावाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून लस घेतल्यानंतर तब्बल 2 आठवड्याने उस्मानाबाद जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर (Kaustubh Divegaonkar) कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी घरीच उपचार घेत आहेत. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी यांनी कोरोनाच्या कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस या महिन्याच्या सुरुवातीला घेतलेला होता. त्यामुळे लसीच्या प्रभावबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.  (Question marks over corona vaccine effect? osmanabad Collecter Kaustubh Divegaonkar Corona Positive)

काम रखडू नयेत म्हणून वर्क फ्रॉम होम करणार

जिल्हाधिकारी यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी व काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. जिल्हाधिकारी यांची प्रकृती स्थिर असून ते कोरोना झाल्यानंतरही पूर्णपणे सुट्टी घेणार नसून शासकीय कामे रखडू नये यासाठी वर्क फ्रॉम होम म्हणजे घरातून काम करणार आहेत. लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगत मी घेतली ,तुम्ही पण घ्या असा प्रचार जिल्हाधिकारी यांनी केला होता.

जिल्हाधिकारी विलगीकरणात

जिल्हाधिकारी यांना अंगात ताप असल्याने डॉक्टरांनी कोरोना चाचणीचा सल्ला दिला होता. त्यानुसार चाचणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्राथमिक तपासणी व उपचाराची दिशा ठरवून दिल्यानंतर ते आता विलगीकरणात आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांचं विशेष आवाहन

मागील काही दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयांमधील गर्दी प्रचंड वाढली. लोक मास्क न घालता गर्दी करत. आपण त्यांना सांगितल्यावर मास्क लावत पण माझ्याबाबतीत तोवर व्हायचा तो परीणाम झालाच असे म्हणावे लागेल. त्यामुळे नो मास्क नो एन्ट्री, मास्क तोंडावरून खाली ओढून बोलणे यावर कडक कार्यवाही आवश्यक आहे असे जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या संदेशात नमूद केले आहे. मी दोन आठवड्यापूर्वी लस घेतली आहे. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते पण कोरोना विरुद्ध पूर्ण क्षमता तयार होण्यास दुसरा डोस आणि त्यानंतर काही दिवस लागतात. हे सर्व पाहता आपण सर्व फ्रंट लाईन वर्कर्स जसे की महसूल, आरोग्य, पोलीस यांनी अत्यंत सावध राहा. कोणतेही लक्षण अंगावर न काढता तपासणी करून घ्या, असे आवाहन दिवेगावकर यांनी केले आहे.

“मला आनंद आहे की, उस्मानाबाद जिल्ह्यात मागील ६ महिन्यात ज्या सोयी सुविधा आपण शासकीय रुग्णालयांत निर्माण केल्या त्याचाच लाभ मलाही मिळत आहे. मागील आठवडाभरात आपण कोविड च्या दुसऱ्या लाटेसाठी तयार सुरू केली आहे. अँटीजन किट्स, N95, नवीन ऑक्सीजन सिलेंडर, नवीन २०० ऑक्सीजन लाईन, 2D इको व इतर नवी यंत्रसामग्री याबाबत नियोजन केलेले आहे. ९६० CCC बेड्सची सुविधा पूनःस्थापित करण्याचे काम वेगात सुरू करावे. लक्षणे असणाऱ्या सर्व व्यक्तींची चाचणी, विलगीकरण, कॉन्टॅक्ट ट्रेसींग ही प्रक्रिया वेगात राबवायची आहे. लोकांनी कोणतेही लक्षण अंगावर काढू नये यासाठी सरकारी खाजगी हॉस्पिटल्स व सर्वांनीच जनजागृती केली पाहिजे”, असं ते म्हणाले.

“मी पूर्ण सुट्टी न घेता वर्क फ्रॉम होम करणार आहे. जेणेकरून महत्वाच्या विषयात खोळंबा होणार नाही. काल केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाची SOP प्राप्त झाली आहे. त्या SOP व राज्य शासनाच्या विविध सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. आपण सर्वजण मागील एक वर्षापासून COVID च्या साथीचा सामना करत आहोत. इतिहासाला नोंद घ्यावी लागेल इतके मोठे काम महाराष्ट्रातील यंत्रणांनी केले आहे”, असे ते म्हणाले.

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाची आकडेवारी वाढत असतानाच खुद्द जिल्हाधिकारी यांना कोरोना झाल्याने मोठी खळबळ उडाली असून कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे गरजेचे आहे.

(Question marks over corona vaccine effect? osmanabad Collecter Kaustubh Divegaonkar Corona Positive)

हे ही वाचा :

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे बीएमसी अलर्टवर, वांद्र्यात 650 जणांना दंड, 145 कॅफे अँड बारवर गुन्हे