Rahul Gandhi : हजारो मुलींसमोर राहुल गांधींचं मनुस्मृतीवर मोठं भाष्य; तरुणीच्या भविष्याबद्दल बोलताना सांगितलं काँग्रेसचं व्हिजन!
काँग्रेस नेते राहुल गांधींनी पुण्यात 'छात्रों की गुंज' कार्यक्रमात तरूणाईशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी त्यांनी मनुस्मृतीवर टीका केली. मनुस्मृती महिलांना स्वातंत्र्य नाकारते आणि त्यांना विशिष्ट चौकटीत बसवते, असे राहुल गांधी म्हणाले.

काँग्रेस नेते राहुल गांधी आज पुण्यात असून ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमात सहभागी झाले. सभास्थळी मोठ्या उत्साहाने आलेल्या तरूणाईशी, जेन-झी शी त्यांनी मनमोकळेपणाने संवाद साधला. पुण्यातील कार्यक्रमात संबोधित करताना राहुल गांधी यांनी मनुस्मृतीवर मोठं भाष्य केलं . “ मनुस्मृतीने महिलांना 3 चौकटीत बसवलं. महिलांना स्वातंत्र्य नाही असा मनुस्मृतीचा विचार ” असं राहुल गांधी म्हणाले. विद्येचे माहेर समजल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘छात्रों की गुंज’ या कार्यक्रमासाठी काँग्रेसकडून गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार तयारी सुरू होती. काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते याच कार्यक्रमासाठी पुण्यात होते. दरम्यान आजच्या कार्यक्रमापूर्वी काल पुण्यात एबीव्हीपी आणि एनएसयूआयचे कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता, त्याच पार्श्वभूमीवर कार्यक्रमस्थळी चोख बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.
आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी दिलखुलास संवाद साधला. पुण्यातील या कार्यक्रमाला मुलींची, महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. तरुणींच्या भविष्याबद्दल बोलताना राहुल गांधी यांनी काँग्रेसचं व्हिजनही सांगितलं. महिला या देशाची सर्वात मोठी ताकद आहे, असं म्हणत राहुल गांधी यांनी आजच्या कार्यक्रमात महिला सक्षमीकरण आणि त्यांच्या स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर भर दिला. शेकडो महिलांच्या उपस्थितीत त्यांनी पिंजरा तोडा असे आवाहन करत, महिलांनी त्यांच्यातील अद्वितीय क्षमता ओळखून सामाजिक बंधनातून मुक्त व्हावं, असं प्रतिपादन केलं.
काय म्हणाले राहुल गांधी ?
मी आज राजकारणावर बोलणार नाही. भारताची ताकद काय असं मला अनेकदा विचारलं जातं.त्याबद्दल वेगवेगळी उत्तर मिळतात, पण माझं त्यावर स्पष्ट मत आहे. 70 कोटी भारतीय महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद आहे. देशातील महिला या देशाची सर्वात मोठी ताकद आहे, असं ते म्हणाले.
महिलांना केवळ मुलगी, पत्नी किंवा आई या तीन चौकटीत पाहणे चुकीचे आहे. या भूमिका महत्त्वाच्या असल्या तरी, ती त्यांची एकमेव ओळख असू नये, असं राहुल गांधींनी स्पष्ट केलं. पुढे त्यांनी मनुस्मृतीचा दाखला देत म्हटलं की, मनुस्मृतीत असं म्हटलंय ती महिला बालपणी वडिलांच्या वडिलांसठी, तारुण्यात पतीसाठी आणि म्हातारपणी निधनानंतर मुलांसाठी जगचे. तसेच महिलांनी कधीही स्वतंत्र असू नये असंही नमूद केलं आहे. मात्र हे विचार लज्जास्पद असल्याचं म्हणत राहुल यांनी त्यांचा तीव्र निषेध केला. आपल्या स्त्रिया स्वतंत्र असायला हव्यात. तुम्ही कोणावरही अवलंबून नाही. तुमचे तुमच्या वडिलांशी, नवऱ्याशी आणि मुलाशी नातेसंबंध असतात, पण तुमची ओळख त्यांच्यामुळे ठरत नाही. तुमची स्वतःची ओळख असते. महिला या पुरुषांच्या तुलनेत स्वभावतः अधिक संवेदनशील, सौम्य आणि दयाळू असतात. त्यामुळेच माझा ठाम विश्वास आहे की, भारतातील महिला ही देशाची सर्वात मोठी संपत्ती आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं.
महिलांकडे पाहण्याच्या समाजाच्या पारंपरिक दृष्टिकोनावर भाष्य करताना त्यांनी सांगितलं की, अनेकदा महिलांची ओळख त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिमत्त्वापेक्षा त्यांच्या कौटुंबिक भूमिकांशी जोडली जाते. पुरुषांशी संवाद साधताना महिलांकडे प्रामुख्याने तीनच चौकटींमध्ये पाहिले जाते— मुलगी, पत्नी किंवा आई. या भूमिका नक्कीच महत्त्वाच्या आहेत आणि त्यांच्यात कोणतीही कमीपणा किंवा गैर नाही. मात्र, एखाद्या महिलेची ओळख केवळ या नात्यांपुरती मर्यादित राहू नये असं ते म्हणाले.
बातमी अपडेट होत आहे.