
रायगडमधल्या खालापूरमध्ये दरड कोसळ्याची घटना घडली आहे. खालापूरमधल्या इर्शाळवाडी गावावर ही दरड कोसळली आहे. इर्शाळ गडाच्या पायथ्याशी ही घटना घडली आहे.

इर्शाळगडाजवळ डोंगराजवळील एका गावावर काल रात्री दरड कोसळली. या दरडीखाली 50 ते 60 घरे दबली आहेत. आतापर्यंत या दरडीखालून 34 जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला आहे.

चौक गावापासून ६ किमी डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात आदिवासी वाडी आहे. दरड या रहिवासी घरांवर कोसळली आहे. आदिवासी ठाकूर समाजाची घरे आहेत.

रात्री अख्खं गाव झोपलेलं असताना अचानकपणे डोंगराचा काही भाग कोसळला आणि यात 200-250 लोकसंख्या असलेलं गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली दबलं गेलं. या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 25 जणांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे. तर 4 जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.

Irshalwadi raigad landslide

घटनेची माहिती मिळताच NDRF ची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. त्यांच्याकडून बचाव कार्याला सुरूवात झाली आहे. मात्र इर्शाळगड हे गाव डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं आहे. इर्शाळगडाच्या पायथ्याशी हे गाव आहे.

या गावात जाण्यासाठी केवळ पायवाट आहे. त्यामुळे तिथे यंत्रणा पोहोचण्यास अडचणी येत आहेत. जेसीबी. पोकलेन यासारखी वाहणं तिथं पोहचू शकत नाहीयेत. त्यामुळे कुदळ, फावड्याच्या सहाय्याने NDRF कडून बचावकार्य केलं जात आहे. स्थानिकही या बचाव कार्यात सहभागी झाले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे इर्शाळवाडी गावात दाखल झाले आहेत. तिथल्या परिस्थितीचा ते आढावा घेत आहेत. स्थानिकांशी संवाद साधत ते धीर देत आहेत. आमच्या नातेवाईकांना वाचवा, अशी विनंती स्थानिक मुख्यमंत्र्यांकडे करत आहेत.

रायगडचे पालकमंत्री उदय सामंत घटनास्थळी दाखल झाले आहेत. ते या संपूर्ण घटनेचा आढावा घेत आहेत. तसंच मंत्री गिरीश महाजनदेखील घटनास्थळी पोहोचले आहेत. ते या सगळ्या बचाव कार्यावर लक्ष ठेवून आहेत.

इर्शाळवाडीतील या घटनेची माहिती मिळताच विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे रायगडच्या दिशेने रवाना झाले आहेत.