‘आम्हीही गिअर बदलणार’ शिंदे सेनेच्या आमदाराचे सूचक विधान ‘महायुती धर्म आम्हीच का पाळायचा?’ विचारला सवाल, राज्याच्या राजकारणात मोठं काही घडणार?
Mahendra Dalvi attack on Sunil Tatkare : सध्या राज्यात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील कुरबुर वाढली आहे. विशेषतः रायगडमध्ये तर वाद अत्यंत टोकाला पोहचला आहे. महायुतीची सत्ता आल्यापासून वाद आणि एकमेकांवर तुटून पडण्याची एकही संधी दोन्ही गट सोडत नाहीत. त्यात आता तर या आमदाराने टोकाची भूमिका जाहीर केली आहे.

Mahendra Dalvi attack on Sunil Tatkare : रायगडच्या राजकारणात महायुती धर्मावरून पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. आमदार महेंद्र दळवी यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका करत राष्ट्रवादीने प्रत्येक निवडणुकीत राजकीय भूमिका बदलल्याचा आरोप केला. सध्या रायगडच्या निवडणुकीत शिंदे सेना विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना सुरू आहे. पालकमंत्री पदावरून अनेक वर्षे धुसफूस सुरू होती. ती यंदा थांबली. पण महाडचे आमदार आणि पालकमंत्री भरतशेठ गोगावले, कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि अलिबागचे आमदार महेंद्र दळवी विरुद्ध राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे असा वाद टोकाला गेला आहे. हे तीनही नेते तटकरे यांच्यावर तोंडसुख घेताना दिसत आहेत.
महायुती धर्मावरून महेंद्र दळवींचा सुनील तटकरे यांच्यावर निशाणा
महायुती धर्म आम्हीच का पाळायचा? असा सवाल करत यापुढे स्थानिक पातळीवर आम्हीही गिअर बदलणार, असा सूचक इशारा दळवींनी दिला. इतकंच नाही तर तटकरे गटाची संपूर्ण बॅत बाहेर गेली पाहिजे, असं वक्तव्य करत तटकरे यांच्यावर शंभर अपराध पूर्ण झाल्याचा आरोपही केला. जिल्ह्यात फसवणूक झाली नाही अशी एक व्यक्ती दाखवा, असं खुलं आव्हान देत महेंद्र दळवींनी रायगडच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फोडलं आहे.
दोन दिवसांपूर्वीच विखारी टीका
रायगड जिल्ह्यातील माणगाव येथील प्रवेश सोहळ्यात शिंदेसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांची जीभ घसरल्याचा प्रकार समोर आला आहे. तटकरे यांच्याबद्दल बोलताना दळवींनी आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला. तटकरे असा अवलिया आहे, जन्माला आला तेव्हा गेला असता तर वारभर कपड्यात गेला असता, आता सहा मीटर कपडा लागले असे वादग्रस्त वक्तव्य दळवींनी केली. आता माझी भाषा संपी. शेवटच्या टोकाचं बोलतोय, असंही ते म्हणाले. शिवसेना आणि राष्ट्रवादीत दरार नाही, तर दरी पडली आहे. ही दरी कधीही मिटणार नाही, असं विधान त्यांनी केलं होतं. आता तर दळवी यांनी रायगड जिल्ह्याच्या स्थानिक राजकारणात शिंदे सेने एकला चलो रे जाणार असे जणू सूतोवाच केले आहे. आम्हीही गिअर बदलणार असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. त्यामुळे येत्या काही दिवसात रायगड आणि कोकणातील राजकारणात राष्ट्रवादी विरुद्ध शिंदे सेना असा वाद टोकाला जाऊ शकतो.